
”भाजपच्या निष्ठावंतांची हालत खराब झाली आहे. माखलेल्या बरबटलेल्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना धुवून पुसून खांद्यावर नाचवायचं हेच काम निष्ठावंतांना राहिलं आहे. राष्ट्रप्रथम असलेला भाजप मेला; आता भ्रष्टाचारी, बलात्कारी, दरोडेखोर प्रथम हे आता भाजपचं घोषवाक्य झालंय”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेत केला.
छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानात अतिविराट सभा पार पडली. यावेळी मैदान चारीबाजूंनी शिवसैनिकांनी खचाखच भरले होते. रस्ते देखील शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेलेले. सगळीकडे एकच शिवसेनेचा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष सुरू होता. या सभेमुळे शहरातलं संपूर्ण वातावरण भगवामय झालं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी भाजप व गद्दार गटांवर जोरदार ताशेरे ओढले.
”आजची ही सभा अभूतपूर्व आहे. विरोधकांना हे मान्य करावंच लागेल. अंबादास तुम्ही सत्तााधाऱ्यांना जे आव्हान दिलंय ते त्यांना पेलेल असं वाटत नाह. त्यांच्याकडे सत्तेची, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. मला आज 1988 ला शिवसेनाप्रमुखांची झालेली सभा आठवली. ज्यांना दिलं ते माजले, गद्दार झाले. चला नवीन सुरुवात करूया. काही बिघडलं नाही. कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आले आहेत. आज आपल्या शिवसेनेची देखील आपण नव्याने सुरुवात करूया”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच तिथे उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रथम भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा खसपूस समाचार घेतला. ”भाजपचे पडलेले खासदार रावसाहेब दानवे, पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे की त्यांच्या ताटात सगळेच पक्ष जेवून गेलेयत. हे जर खरं असेल तर आता तुम्ही आमच्या पानातलं उष्ट का खाताय. तुम्हाला भस्म्या झालाय का? किती खायचं. रावसाहेब दानवेंना मला सांगायचं आहे की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दोन घास भरवले नसते तर आज कुषोषणाने राजकारणात तुमचा मृत्यू झाला असता. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
”मला आश्चर्याचा धक्का बसला आणि वाईटही वाटलं. की मी मुख्यमंत्री असताना सुरू असलेली कामं अजुनही पूर्ण झालेली नाही. शहरात 365 मधले फक्त 44 दिवस पाणी येतंय. संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? राहतात तर त्यांना राग चीड येते की नाही. आपलं सरकार असतं तर आज घराघरात पाणी आलं असतं. मी काय केलं होतं, हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे. पाण्याच्या योजनेसाठी फक्त पैसे नव्हते मंजूर केले तर कामही सुरू केलं होतं. जेव्हा मला कळलं की आपल्या महापालिकेकडे पैसे नाहीत मी सरकारच्या योजनेतून ते काम पूर्ण करून घेतले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ज्या संभाजीनगरवर शिवसेनाप्रमुखांचं अलोट प्रेम आहे त्या संभाजीनगरात त्यांच्या शिवसेनेचा लोकसभा व विधानसभेत पराभव झाला हे शल्य त्यांना सुद्धा लागलं आहे. एक नातं आपलं आणि संभाजीनगरचं शिवसेनाप्रमुख मानत होते. त्या नात्याच्या हक्काने मी इथे आलोय. मला इथे प्रेम दिसतंय कारण आज प्रेम नसतं तर आज हे मैदान भरलेलं नसतं. इथे एकही माणूस पैसे देऊन आणलेला नाही. एवढी गर्दी होऊनही पैशाची मस्ती निवडणूक फिरवत आहे. ते म्हणतात की ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे. तुम्ही आमच्या अस्तित्वाची काळजी करू नका. आमच्या अस्तित्वाची ही लढाई नाही ही तुमच्या भविष्याची लढाई आहे आणि आम्ही त्यासाठी लढतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आज अजित पवारांच्या होर्डिंगवर एक वाक्य वाचलं की संभाजीनगर नशामुक्त करू. अहो सरकार तुमच्या हातात असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. लोकांच्या घरात पाणी येत नाही पण दारूचे परवाने पटापट मिळतायत. संभाजीनगर नशामुक्त करणार सांगतात मग साताऱ्यात जे अंमली पदार्थ सापडले ती फॅक्टरी कुणाची होती हे जाहीर का नाही करत? कसे करणार तुम्ही नशामुक्त, तुमच्यामध्येत त्यांच्यातले गुन्हेगार बसलेले असतील तर तुम्हाला त्यांच्यावर पांघरून घालावं लागत असेल तर कशी नशामुक्ती करणार. दीड हजार रुपये देतायत तुम्हाला. हे दीड हजार तुमच्या मताची किंमत नाही तर तुमच्या आयुष्याची किंमत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
यावेळी त्यांनी अमित शहा यांना एक आव्हानही दिलं. ”आम्ही जर का या शहराचं नाव संभाजीनगर केलं नसतं तर भाजपमध्ये एवढी हिंमत नव्हती. त्यांच्यात एवढी हिंमत असेल तर त्यांनी अहमदाबादचे कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज मी त्यांना आव्हान देतोय. अमित शहांचा मतदारसंघ आहे ना. तुमच्या मतदारसंघाचं नामांतर करून दाखवा. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची ही यांची वृत्ती आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपची सालटी काढली.
विकृत माणसाला स्वीकृत नगरसेवक केलं
”दिड वर्षापूर्वी बदलापूरमध्ये चिमुकलीवर शाळेत अत्याचार झाले होते. त्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर केला गेला. अक्षय शिंदे तोंड उघडेल म्हणून त्याला गोळ्या घातल्या असं बोलले जात होतं. बदलापूरमध्ये चांगले नगरसेवक निवडून आल्यानंतर सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केला. नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून विकृत माणसाला स्वीकृत नगरसेवक केलं. विकृत माणसाला स्वीकृत करता हेच तुमचं हिंदुत्व आहे का? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच पुढे ते म्हणाले की, ”पालघरमध्ये साधूची हत्या झाली होती. त्या हत्याकांडातील आरोपीला भाजपने पक्षात प्रवेश दिला. हे तुमचं हिंदुत्व. यांना भ्रष्टाचारी, दरोडेखोर, गुंड पक्षात चालतायत. आता राष्ट्रप्रथम असलेला भाजप मेला; आता भ्रष्टाचारी, बलात्कारी, दरोडेखोर प्रथम हे आता भाजपचं घोषवाक्य झालंय. भाजपच्या निष्ठावंतांची हालत खराब झाली आहे. माखलेल्या बरबटलेल्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना धुवून पुसून खांद्यावर घ्यायचे हेच काम निष्ठावंतांना राहिलं आहे. जयंत पाटील काल बोलले की ये बंद करने आये थे तवायफों के कोठे मगर सिक्कोंकी खनक सुनकर खुदही मुजरा कर बैठे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीस, सत्तेसाठी दुतोंडी गांडूळासारखी वळवळ करू नका
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. आणि आता त्यांच्या मांडिला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसतायत. तेव्हा देवेंद्र फडणवीस ढीगभर पुरावे घेऊन गेले होते. चौकशी लावली. आज त्यांनीच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलंय, तर फडणवीसांनी त्या पुराव्यांचं काय करायचं हे सांगावं. मी फडणवीसांना आव्हान करतो की त्यांनी दोन गोष्टी कराव्या. एकतर तुम्ही दिलेल्या पुराव्यामध्ये तथ्य असेल तर अजित पवारांचा राजीनामा घ्या, किंवा जर ते पुरावे खोटे असतील तर फडणवीसांनी अजित पवारांची माफी मागावी. फडणवीस, सत्तेसाठी दुतोंडी गांडूळासारखी वळवळ करू नका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
बांगलादेशींची घुसखोरी हे अमित शहांचं अपयश
मला एक निवडणूक अशी दाखवा ज्यात यांनी केलेली कामं सांगितलीत की नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. एक भाषण असं दाखवा जे यांनी हिंदू मुसलमान वाद न लावता केलं आहे, मी त्यांना एक लाख रुपये देतो. कामं काय केली ते सांगा. 2014 पासून माझी मधली अडीच वर्ष सोडली सर्व सत्ता तुमच्याकडे आहे. तरी निवडणूक आली की मुंबईत बांगलादेशी घुसलेय सांगता. हे अपयश तुमचं आहे. अमित शहांचं अपयश आहे. सीमा सुरक्षित ठेवता येत नाहीए. म्हणून बांगलादेशी घुसलेयत. दहा वर्षात किती बांगलादेशी तुम्ही बाहेर काढले ते सांगा, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
…तर महाराष्ट्रही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
दोन हजार रुपये माझ्या भाषणावर बक्षिस लावण्यापेक्षा जा माझ्या शेतकऱ्याचं जे देणं आहे ते द्या. आता फोन पे वर दोन दोन हजार वाटले जातायत. निवडणूक आय़ोगाने यात लक्ष घालायला पाहिजे. सगळा कारभार हे पैशाने विकत घेत आहेत. ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिथे विरोधी पक्षाकडून कुणी उमेदवार शिल्लक राहू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र हा लढवैय्या आहे. तो गद्दाराला साथ देत नाही. अधिकारांची मस्ती घेऊन उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. जाल कुठे तुम्ही. सगळीकडे पैशांची सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालसारखा महाराष्ट्रही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.






























































