अर्थव्यवस्थेच्या हत्तीचा ‘माहुत’ बनायला कोणीच तयार नाही – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळय़ांच्या गोष्टीसारखी झाली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थाच मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या हत्तीवर ‘माहुत’ म्हणून बसायला कोणीच तयार नाही, असे खडेबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

सारस्वत बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा वरळीच्या एनएससीआय-एसव्हीपी स्टेडियम येथे पार पडला. त्या समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, एम.डी. स्मिता संधाने आदी उपस्थित होते.

बँकेचे संचालक पी. एन. जोशी यांच्या ‘आर्थिक व बँकिंग धोरणाच्या बदलत्या छटा’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, या पुस्तकात अर्थव्यवस्थेच्या विविध बाबी, नोटाबंदीचे यशापयश आदी गोष्टी मांडल्या असून ते वाचनीय झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या लयाला गेली आहे. कोणालाच काही कळत नाही तरीही आंधळे एकमेकांचा हात धरून आहेत, पण माहुत म्हणून हत्तीवर बसण्याचे धाडस कोणीच करत नाही.

सामान्य माणसाची स्थिती मात्र एक आंधळा आणि सात हत्तींसारखी झाली आहे. प्रत्येक जण त्याला इकडून तिकडून डिवचत आहे. त्यामुळे तो जखमी होऊन पडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण ते न करता त्याला तू भोसकले की मी भोसकले या वादातच आधीचे सरकार आणि आताचे सरकार पडले असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

आता बँक स्थापन करताना आधी पोहता येते का विचारावे लागेल!
सध्या देशात विचित्र परिस्थिती आहे. सर्वत्र बुडाबुडी आणि बुडवाबुडवी सुरू आहे. त्यामुळे या परिस्थितीत कोणाला एखादी बँक स्थापन करायची असेल तर तुला पोहता येते का, असे विचारावे लागेल, असा उपरोधिक टोला सध्याच्या परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी लगावताच सभागृहात एकच हशा पिकला.

एकनाथ ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळेच बँकेची दमदार वाटचाल – पवार
‘सारस्वत’चे माजी अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळेच त्या बँकेची दमदार शतकी वाटचाल झाली आणि विस्तार झाला असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या समारंभात काढले. संसदेत असतानाही ठाकूर यांनी सहकाराच्या, बँकेच्या लौकिकासाठीच काम केले, असे ते म्हणाले.