‘आमदार चषक’ स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण, उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

वर्सोवा येथील शिवसेना आमदार हारुन खान यांनी आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

देशातून आठ संघ आणि वर्सोवा विधानसभेतून 16 संघ या स्पर्धेत उतरले आहेत. या संघांचे ओनर्सही यावेळी उपस्थित होते. अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात 23 नोव्हेंबरपासून 29 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. त्यातील 26 व 27 नोव्हेंबर या दोन दिवसात देशातील संघांमध्ये लढत होणार आहे, अशी माहिती यावेळी हारुन खान यांनी दिली. स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशाच स्थानिक स्पर्धांमधून जागतिक पातळीवरील क्रिकेटपटू देशाला मिळतील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.