सिरमचे नुकसान; कोविशिल्ड सुरक्षित, आगीची सखोल चौकशी सुरू

जगभरात धुमाकूळ घालणाऱया कोरोना व्हायरसवर सिरम इन्स्टिटय़ूटकडून लसनिर्मिती सुरू आहे. कंपनीला आग लागल्याचे समजताच क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, सुदैवाने लस बनविण्यात येणारे ठिकाण सुरक्षित असल्यामुळे चिंता नाही. आगीसंदर्भात चौकशी केली जात असून, अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढता येणार नाही. आग नेमकी कशामुळे लागली यावर आता भाष्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सीरम इन्स्टिटय़ूटला काल आग लागल्याचे समजताच तत्काळ संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कंपनीला आग लागल्याचे समजताच क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता; मात्र सुदैवाने लस बनविण्यात येणारे ठिकाण सुरक्षित असल्यामुळे चिंता नाही.

कंपनीतील आगीची दुर्घटना घडल्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. सुदैवाने कोरोना व्हायरसवरील लस बनविणाऱया ठिकाणी आग लागली नाही. कोविशिल्ड प्लांट सुरक्षित आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाचही कामगारांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सीरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय आणखी काही आवश्यकता भासल्यास सरकारकडूनही मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सीरमचे सायरस पूनावाला, अदर पूनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

आग लागल्याचा अहवाल येऊ द्या

सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत आगीचे कारण स्पष्ट होणार नाही. आगीचा अहवाल आल्यानंतर हा अपघात होता की घातपात याची माहिती मिळणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

आगीत 1 हजार कोटींचे नुकसान – अदर पूनावाला

सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये काल लागलेल्या आगीत तब्बल 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. रोटा व्हायरस आणि बीसीजी लसीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीत इतर तीन ते चार प्लांटचे नुकसान झाले आहे. मात्र, तरीही लसपुरवठा करताना कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टिटय़ूटचे संचालक अदर पूनावाला यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या