गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन, उद्या वांद्र्याच्या रंगशारदामध्ये सभा

मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीची स्थापना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 2003 मध्ये झाली आहे. शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपनगर समन्वय समितीसाठी नेहमीच शक्तिस्थान ठरले आहेत.

या गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून उपनगरातील मंडळांच्या समस्या नियमितपणे सोडवण्यात येत असून मार्गदर्शनही करण्यात येत आहे. या समितीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही नियमितपणे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतात. यामुळे मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरणा मिळते. याच पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समितीच्या सभेत मंडळांना मार्गदर्शन करणार असल्याचे शिवसेना उपनेते आणि उपनगर समन्वय समितीचे विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर 29 ऑगस्ट रोजी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. या सभेसाठी उपनगरातील सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना नेते आमदार, मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष अॅड. अनिल परब, उपनेते, उपनगर गणेशोत्सव समितीचे सचिव विनोद घोसाळकर यांनी केले आहे.