
यंदा शिवसेनेची यादी तुम्हीच तयार करा असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यांनी ती तयार केली की मी ती पक्षासमोर ठेवेन आणि युतीची घोषणा होईल, अशी मिश्किल टोलेबाजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना केली.
विधानसभा निवडणुका कधीही घोषित होतील अशी स्थिती असताना शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, झाली तर कोण किती आणि कुठल्या जागा लढवणार याची राजकीय चर्चा तर सुरू आहेच, पण प्रसारमाध्यमांचे मथळेही सजत आहेत. भाजपचे काही नेते गेले काही दिवस युती आणि जागावाटपाबाबत उलटसुलट विधाने करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीची बोलणी कुठवर आली आहेत असा सवाल केला.
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात
उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले, पण नंतर अत्यंत मिश्किल आणि मार्मिक टिप्पणी करत ते म्हणाले, यावेळी मी एक वेगळा मार्ग स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, शिवसेनेची यादी तुम्हीच तयार करा. त्यानुसार जागा आणि संख्या तयार करून ते मला देतील. मी ती यादी पक्षासमोर ठेवेन आणि मग युतीची घोषणा होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच पत्रकारांमध्ये एकच हंशा उसळला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, ‘म्हाडा’ अध्यक्ष उदय सामंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
निवडणुका जाहीर होऊ द्या, मग कळेल!
आम्ही कुणाला हरवण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी लढत असतो. त्यामुळेच चांगली लोकं आमच्याकडे येत आहेत. अजून बरेच लोक शिवसेनेत यायचे बाकी आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना विधानसभेच्या किती जागा लढवणार या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी काही मागितले नाही आणि आकडेवारीवर मी काहीच बोलत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात ठरले आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, तुम्हाला सर्व काही कळेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.























































