आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, संस्कार आहेत. ते जपण्यासाठी आणि पुढील काळात अधिक दृढ करण्यासाठी एकत्र राहू आणि देशावर आलेले भाजपरूपी संकट एकजुटीने, वज्रमुठीने कायमचे संपवून टाकू, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात केले. लोकसभेत करून दाखवलेच आहे, आता आपापसात भांडणार नाही, अशी प्रतिज्ञा करून आगामी निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचा उरलासुरला सुपडाही साफ करूया, असे ते म्हणाले.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात या सद्भावना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत मी सक्रिय राजकारणात नव्हतो. शिवसेना तर काँग्रेसच्या विरोधात होती. पण एक गोष्ट नक्की जे पटत नव्हते ते त्यावेळीही बोलत होतो आणि आजही बोलतो, पण त्या बोलण्याला सूडभावना नाही. शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांचा विरोध कडाडून करत होते, पण कधीही एकमेकांविरुद्ध सूडभावनेने वागले नाहीत. यालाच राज्यकर्ता म्हणतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूडभावना आहे. पण शिवसेना नेहमी सद्भावनेच्या बाजूने आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
भगिनी आक्रोश करताहेत, आमची लेकरं सुरक्षित नसतील तर तुमचे पंधराशे नकोत
उद्धव ठाकरे यांनी यावेळीही बदलापुरातील घटनेबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. बदलापुरातील घटनेनंतर तेथील भगिनी आक्रोश करताहेत, आमची लेकरं सुरक्षित नसतील तर तुमचे पंधराशे नकोत. घडलेली घटना अत्यंत विपृत आहे, पण सरकार तिच्याकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. अत्याचाऱ्यांना शिक्षा देण्यास विलंब झाला तर दरम्यानच्या काळात आणखी गुन्हे घडतात, त्यामुळे जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्यातील गुन्हेगारांना उलटे टांगून सुलटे करून मग फाशी दिली पाहिजे, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.
भाजपा मित्र होऊ शकत नाही
राजीव गांधी शिवसेनेशी कधीही सूडभावनेने वागले नाहीत, पण शिवसेना संकटाच्या काळात ज्यांच्या मागे उभी राहिली ती भाजपा शिवसेनेलाच संपवायला निघाली, शिवसेनेचा दुरुपयोग करून शिवसेनेलाच लाथा घालायला लागली, ती शिवसेनेचा मित्र होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारणातील दिलदारपणा संपलाय
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोदी सरकारने मागच्या रांगेत बसवले होते. मोदी सरकारच्या काळात राजकारणातील संस्कृती आणि दिलदारपणा संपलाय. ज्यांना दिलच नाही तर दार कुठून असणार, असे ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका करूनही शिवसैनिकांच्या घरी कधी ईडी आली नव्हती
शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, सरकारविरुद्ध विरोधी पक्षातील काँग्रेसचे लोक आंदोलने करतील, पण त्यांच्यावर लाठी अजिबात उगारायची नाही. ते काँग्रेसचे असले तरी ती माझ्या महाराष्ट्राची मुले आहेत. ही माणुसकी आज लोप पावत आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राजीव गांधींवरही बाळासाहेबांनी सडेतोड टीका केली, पण कधीही शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय इन्कमटॅक्स आली नव्हती, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
राजीव गांधींनी मोदींसारखी कधीही समस्येकडे पाठ केली नाही
राजीव गांधी सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्ती होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कोणत्याही लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणताच व्यासपीठासह सभागृहात हशा पिकला. देशाची संस्कृती, संस्कार पुसून टाकण्याचा आज प्रयत्न होतोय, असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कोणत्याही समस्येकडे पाठ दाखवली नाही. पण आज मणिपूर पेटलेय, कश्मीर पेटलेय त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असे ते म्हणाले.
या सद्भावना मेळाव्यात सर्व उपस्थितांनी एक प्रतिज्ञा केली. ‘मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यामध्ये भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करेन. आमच्यातील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करून व संवैधानिक मार्गाने सोडवेन.’ अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.
नेहरू-गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही – शरद पवार
देश घडवण्यात नेहरू व गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. देशाच्या इतिहासातून नेहरू-गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले. मुंबई व काँग्रेस, मुंबई व राजीव गांधी यांचे वेगळे नाते आहे, असे सांगत त्यांनी त्यासंदर्भातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे, त्यांनी देशाला नवी दिशा दिली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना नेहरू-गांधी काय होते माहीत नाही, ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्याविषयी आकसाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेतात हे चुकीचे आहे. देशाला आधुनिकतेकडे कसे घेऊन जायचे याचा ध्यास राजीव गांधी यांनी घेतला होता, याची आठवणही शरद पवार यांनी यावेळी करून दिली.
हुकूमशहा बनून सत्ता नियंत्रित करण्याचा मोदींचा प्रयत्न – मल्लिकार्जुन खरगे
नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशहा बनून सत्ता नियंत्रित करू पाहत आहेत. पण महाराष्ट्रातील आयाबहिणींनी लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच हिसका दाखवला, असा हल्लाबोल यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ‘इंडिया’ आघाडीला जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत देशाच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वात जास्त 415 जागी विजय मिळवला, पण त्यांना अहंकार नव्हता, मात्र नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला, पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगू देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे, असे खरगे यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढून महाविकास आघाडीचे सरकार आणूया, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप एक विषारी साप आहे त्याला उखडून टाका, असेही खरगे म्हणाले.
काँग्रेसने मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हंडोरे, केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य नसीम खान, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.