
युगांडाची राजधानी कम्पालामधे हिंदुस्थानी पॅराबॅडमिंटन टीम राहत असलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटांत 3 जण ठार झाले असून 30 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने हिंदुस्थानी पॅराबॅडमिंटनपटू सुरक्षित असून त्यांना कोणतीही हानी झालेली नाही. इसिसच्या दहशतवाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. मोटरसायकलवरून आलेल्या तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी स्वतःला पेटवून घेत हे स्फोट घडवले. त्यांना युगांडाच्या संसदेला लक्ष्य करायचे होते, असा दावा या स्फोटांची जबाबदारी स्वीकारणाऱया इसिसने केला आहे.
हिंदुस्थानी पॅराबॅडमिंटन टीम युगांडा पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिथे उपस्थित आहे. हिंदुस्थानी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तेथून फक्त 100 मीटर अंतरावर एक बॉम्बस्फोट झाला. दरम्यान, हिंदुस्थानी खेळाडू हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती हिंदुस्थानच्या पॅराबॅडमिंटन संघटनेने दिली आहे.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा प्रमोद भगतही युगांडात
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगतदेखील युगांडात आहे. त्याच्यासोबत मानसी जोशी आणि मनोज सरकार हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक असणारे गौरव खन्नादेखील संघासोबत आहेत. ‘आमच्या निवासी हॉटेलनजीक बॉम्बस्फोट झाला असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. आमच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. थोडा गोंधळ उडाला होता, पण सर्वजण सुरक्षित आहेत. स्पर्धा ठरल्याप्रमाणे होईल.’ अशी माहिती प्रमोद भगतने दिली.




























































