
दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गोलगोटीयाज विद्यापीठाने चिनी रोबोट खरेदी करून स्वतः विकसित केल्याचे दाखवले होते. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मान्यता नसलेल्या 32 विद्यापीठांची नावे आहेत. यापैकी दोन विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत.
यूजीसीच्या यादीनुसार, नागपुरातील राजा अरेबिक विद्यापीठ तसेच सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ ही दोन विद्यापीठे बोगस आहेत. बनावट विद्यापीठांच्या यादीनुसार, दिल्लीत सर्वाधिक 12 विद्यापीठे बोगस आहेत. त्याखालोखाल यूपीमध्ये 4, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुदुच्चेरी, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 2, अरुणाचल प्रदेश, हरयाणा, झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 1 विद्यापीठ बोगस आहे. या विद्यापीठांना केंद्र सरकार तसेच कोणत्याही राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. त्यांना कोणतीही पदवी देण्यासाठी अधिपृत करण्यात आलेले नाही, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.





























































