महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना तत्काळ हटवण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधींनी स्थापन केलेले गुजरात विद्यापीठ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने कुलपतींना या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजेंद्र खिमानी यांना पदावरून हटविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 554 व्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे नुकतेच सार्वजनिक करण्यात आले आहेत. यामधील 2.05 क्रमांकाचा प्रस्ताव हा खिमानी यांच्या नियुक्तीसंदर्भातील होता.

आयोगाने एक तथ्य शोधन समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आयोगाला प्राप्त झाला असून या अहवालाच्या आधारे आयोगाने पुढील कारवाई करायचे ठरवले आहे. डॉ.राजेंद्र खिमानी यांची गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक करत असताना त्यात काही त्रुटी होत्या असं या अहवालात म्हटलं आहे. दुसऱ्या एका तथ्य शोधन समितीच्या अहवालात म्हटलं आहे की खिमानी हे विद्यापीठाचे रजिस्ट्रार असताना 1 एप्रिल 2004 ते 30 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजात काही त्रुटी आढळल्या होत्या. याचा उल्लेखही आयोगाच्या बैठकीच्या इतिवृत्तात करण्यात आला आहे. ही तथ्ये उजेडात आल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलपतींना खिमानी यांना कुलगुरूपदावरून तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. असं न झाल्यास, अनुदान रोखणे आणि अन्य दंडात्मक कारवाईला विद्यापीठाला सामोरे जावे लागू शकते अशी ताकीदही आयोगाने दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत खिमानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मंगळवार संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी आयोगाकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. कोणताही आदेश जारी करण्यापूर्वी समितीने मला भेटून माझीही बाजू जाणून घ्यावी हे अपेक्षित असल्याचं खिमानी यांनी म्हटलंय. आयोगाने 5 मुद्दांवर आपल्याकडून स्पष्टीकरण मागवलं होतं जे आपण जुन-जुलैमध्येच आयोगाला सादर केलं होतं असं खिमानी यांचं म्हणणं आहे.