उजनीतून 51 हजार, तर वीरमधून 30 हजार क्युसेकचा विसर्ग, पंढरपुरातील व्यासनारायण झोडपट्टीत पुराचे पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरण व वीर धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. उजनीतून भीमेला सध्या 51 हजार 600, तर वीरमधून 3 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर भीमेला मिळणाऱ्या ओढय़ा-नाल्यांमधूनही मोठय़ा प्रमाणात पाणी मिसळत असल्याने पंढरपूर येथे 1 लाख 3 हजार 401 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यामुळे व्यासनारायण झोपडपट्टी येथील 20 घरांमध्ये पाणी शिरले आहे.

मागील आठवडय़ात उजनी धरण व वीर धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून मंगळवारी दुपारी 60 हजार क्युसेकचा, तर वीर धरणातून 26 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता, तर बुधवारी सकाळी यात बदल करून विसर्ग हळूहळू कमी करण्यात येत आहे. उजनीतून बुधवारी सायंकाळी 51 हजार 600 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे, तर वीरमधून 3 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी केलेला असला तरी अगोदर मोठय़ा प्रमाणात सोडण्यात आलेला विसर्ग पंढरपूर येथे पोहोचला असून, सध्या पंढरपूर येथे 1 लाख 3 हजार 401 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी येथील 20 घरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या घरांच्या उंबऱ्याला, भिंतीला पाणी लागले आहे. त्यामुळे विसर्ग आणखी वाढला तर या कुटुंबांना ऐन सणासुदीच्या काळात विस्थापित होण्याची वेळ येणार आहे.

दरम्यान, पंढरपूरला पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चंद्रभागा नदीपात्राकडे जाणारे घाटमार्ग बंद

मागील आठवडाभरापासून परतीच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. यामुळे धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील दगडी पूल, तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुंडलिक मंदिरासह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत. घाटांच्या
निम्म्या पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत. त्यामुळे नदीपात्राकडे जाणारे घाट मार्ग प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहेत.

ऊसतोडी, रस्ते वाहतुकीवरही होणार परिणाम

चंद्रभागा नदीकाठच्या शेतीला पाण्याचा फटका बसणार आहे. गाळप हंगामाच्या तोंडावर उसात पाणी शिरल्याने ऊसतोडीवर परिणाम होणार आहे, तर नदीकाठच्या ओढय़ांमधूनही पाणी मागे सरकणार असल्याने अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद पडण्याची भीती आहे. पंढरपूर ते जुना अकलूज रोडवर शिरढोण येथील ओढय़ावरील पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.