आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडले, 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 29 जून रोजी साजऱया होणाऱया आषाढी वारीसाठी उजनी धरणातून आज 4500 क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

26 जूनपर्यंत 4500 क्युसेकने विसर्ग चालू राहणार असून, त्यानंतर 30 जूनपर्यंत एक हजार क्युसेकने पाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. यामुळे 29 जूनच्या आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी येणाऱया पौर्णिमेपर्यंत अर्थात गोपाळपूर येथे होणाऱया काल्याच्या कीर्तनापर्यंत चंद्रभागेमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी राहणार आहे.

दरम्यान, उजनी धरणात 47 टीएमसी पाणीसाठा असून, तो उणे 30 टक्के पाणी शिल्लक आहे. उजनीतून सोडलेले पाणी गोपाळपूर बंधाऱयापर्यंत जाणार आहे. भीमा नदीमधील सर्व बंधाऱयांत पाणी आल्यामुळे नदीकाठावरील गावे व वाडय़ा-वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. तसेच शेतीसाठीही पाण्याचा उपयोग होणार आहे, असे धीरज साळे यांनी सांगितले.