उजनीतील पाणीसाठा 48 टक्क्यांवर

सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाण्याची पातळी 48 टक्क्यांवर आली असून, दररोज एक टक्के पाण्याची घट होत आहे. येत्या जूनपर्यंत धरणातील पाण्याची पातळी मायनसमध्ये जाणार आहे. तीन महिन्यांपूर्वी धरणात 105 टक्के पाणीसाठा होता.

उजनी धरणाच्या पाणीसाठय़ात गेल्या तीन महिन्यांपासून कमालीची घट होत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला 105 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा 48 टक्क्यांवर आला आहे. तब्बल 26 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले जात आहे. 10 मेपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने जूनपर्यंत पाणीसाठा मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिह्यात जूनपर्यंत प्रचंड उन्हाळा जाणवतो. तापमान दिवसेंदिवस वाढत असून, बाष्पीभवनामुळे पाणीपातळी कमी होत आहे. याशिवाय भीमा नदी, कॅनॉल बोगदा आणि उपसासिंचन योजनेमधून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीपातळीत सरासरी एक टक्क्याने दररोज घट होत आहे. मार्च अखेरपर्यंत धरणातील पाणीसाठा 39 टक्क्यांवर येण्याची शक्यता असून, मेपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील पाणीटंचाई पाहाता मे महिन्यात पुन्हा एकदा पाणी सोडावे लागणार आहे.