उज्वला योजना बंद, पण फक्त तीनच राज्य रॉकेल मुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्टेंबर महिन्यात उज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी एलपीजी कनेक्शन नागरिकांना देण्यात आले. या योजनेचे लक्ष्य पूर्ण झाल्याने ही योजना सरकारने बंद केली होती. परंतु गॅस सिलिंडरचे कनेक्शन देऊनही देशातील फक्त तीन राज्य रॉकेल मुक्त झाले आहेत. संसदीय समितीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

द हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. देशात एलपीजी सिलिंडरचा किती वापर होतो याची माहिती त्यांनी आपल्या अहवालात दिली आहे. देशात 97 टक्के नागरिकांकडे एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यापासून उज्वला योजना बंद करण्यात आली. कारण सरकारने जे लक्ष्य ठेवले होते ते पूर्ण झाले होते. त्यानुसार या योजनेचा निधीही घटवण्यात आला होता. 2019-20 दरम्यान 2 हजार 724 कोटींचा निधी या योजनेसाठी देण्यात आला होता. आता 2020-21 साठी 1 हजार 118 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सरकारने या योजनेत 58 टक्क्यांनी निधी कपात केला होता.

गेल्या एक वर्षात 28 कोटी 50 लाख नवीन गॅस कनेक्शन देण्यात आले. त्यापैकी 27 कोटी 70 लाख हे घरगुती वापरासाठी कनेक्शन देण्यात आले.

अजूनही अनेक ठिकाणी रॉकेल आणि पारंपारिक चुलीचा वापर केला जातो. शहरी आणि निमशहरी भागात अजूनही गॅसचे कनेक्शन मिळाले नसल्याचे अहवालात नमूद केल आहे. म्हणून ही योजना अजून वाढवण्यात येऊन प्रत्येक गरीबाच्या घरात गॅस कनेक्शन मिळाले पाहिजे अशी सूचना अहवालात केली आहे.

हरयाणा, पंजाब आणि आंध्र प्रदेश हे तीन राज्य फक्त रॉकेल मुक्त झाले आहे असे अहवालात म्हटले आहे. तसेच दिल्ली, चंदीगड, दमण दीव, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार  आणि पद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेशही रॉकेल मुक्त झाले आहे असेही अहवालात म्हटले आहे.