उजनी-सोलापूर दुहेरी पाइपलाइनचे काम सुरू होणार; लक्ष्मी इंजिनीअर्सला मिळाली वर्क ऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरण ते सोलापूर दुहेरी पाइपलाइनचा विषय आता मार्गी लागला आहे. गेल्या कोरोनामुळे तसेच भूसंपादनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दुहेरी पाइपलाइनचे काम पूर्णपणे ठप्प होते. आता नव्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. याबाबतची अधिक माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली. लक्ष्मी इंजिनीअर्स या कंपनीला हा ठेका मिळाला आहे. याची वर्कऑर्डर स्मार्ट सिटी कंपनीने त्यांना दिली आहे.

लक्ष्मी इंजिनीअर्सने 1.67 टक्के कमी दराने टेंडर टाकल्याने त्यांना ठेका मिळाला आहे. त्यातून ‘स्मार्ट सिटी’ची 4 कोटी रुपयांची बचत होणार आहे. 24 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीने आता पाइप खरेदीस सुरुवातही केली आहे. सोलापूर-पुणे रस्त्याच्या डाव्या बाजूने राष्ट्रीय महामार्गाच्या जागेतून ही पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग कंपनीने यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न मिटला आहे. 110 एमएलडी पाणी दुहेरी पाइपलाइनमधून येणार होते; परंतु नव्या टेंडरनुसार त्यात दीडपट वाढ झाली आहे. दररोज सुमारे 170 एमएलडी पाणी येणार आहे, अशी माहिती त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. दोन वर्षांत हे काम पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर उजनी धरणातील पाण्याची बचतही होणार आहे.