Ukraine Russia War – आतापर्यंत रशियाच्या हल्लात 79 बालकांचा मृत्यू, युक्रेनचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

युक्रेन व रशियामधल्या युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. गेल्या सतरा दिवसात रशियाने युक्रेनवर अनेक हल्ले केले. या हल्ल्यात शहरच्या शहरं बेचिराख झाली आहेत. रशियाच्या या हल्ल्यामध्ये आता पर्यंत 79 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच युक्रेनमधले तब्बल 19 लाख लोकांनी देश सोडला असल्याचे संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून दररोज या युद्धामधील अंगावर शहारे आणणारी दृश्ये समोर येत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्यामुळे आता हे युद्ध थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रशियन सैनिकांच्या गोळीबारात 10 वर्षांच्या युक्रेनी मुलीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत असणाऱ्या रशियन सैनिकांच्या अंदाधुंद गोळीबारात एका 10 वर्षीय युक्रेनी मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. अनास्तासिया स्टोलुक असे या मुलीचे नाव असून, मद्यधुंद रशियन सैनिकांनी आमच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कीवच्या उत्तरेस सुमारे 40 मैल अंतरावर असलेल्या श्याबेने या ठिकाणी अनास्तासिया हि मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी रशियन सैनिकांना कंटाळा आल्याने त्यांनी आजूबाजूची सर्व दुकाने लुटली. या लुटीमध्ये त्यांना भरपूर दारू मिळाली. दारू मिळताच त्यांनी ती ढोसून संपवून टाकली.

ब़ॉम्बहल्ल्यात तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू

युक्रेनमधल्या मारियुपोलमधली स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. रशियाच्या सैन्याने या शहराला वेढा घातला असून इथे मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले केले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य करणं रशियाने सुरू केलं असून मारियुपोलमधल्या एका हॉस्पीटलवर रक्षियाने स्फोटकं डागली होती. या हल्ल्यात 6 वर्षांच्या मुलीसह 3जणांचा मृत्यू झाला होता.