
उत्तराखंड सेवा निवड आयोग (UKSSSC) पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपीला हरिद्वार येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले आहे. या पेपरलीक प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी संतप्त झाले असून त्यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजप हा वोटचोर आणि पेपर चोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘पेपर चोर’ हेच भाजपचे दुसरे नाव आहे, असेही ते म्हणाले.
भाजपने देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. बेरोजगारी ही देशातील मोठी समस्या आहे. पेपर लीकच्या घटना थांबवण्यासाठी पारदर्शक व्यवस्था आणण्याची मागणीही त्यांनी केली. भाजप हा पेपर चोरांचा समानार्थी शब्द आहे. देशभरात वारंवार होणाऱ्या पेपर लीकमुळे लाखो मेहनती तरुणांचे जीवन आणि स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तराखंड यूकेएसएसएससी पेपर लीक हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे. लाखो तरुणांनी दिवसरात्र काम केले, परंतु भाजपने चोरी करून त्यांचे सर्व कष्ट उध्वस्त केले, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, पेपर लीक रोखण्यासाठी मजबूत आणि पारदर्शक प्रणालीची गरज आहे. मात्र, मोदी सरकार याकडे डोळेझाक करत आहे. त्यांना तरुणांच्या बेरोजगारीची नाही तर त्यांच्या स्वतःच्या सत्तेची चिंता आहे. बेरोजगारी ही आज देशातील सर्वात मोठी समस्या आहे आणि ती थेट मतदान चोरीशी जोडलेली आहे. पेपर चोरांना माहित आहे की जरी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तरी ते निवडणुकीत मते चोरून सत्तेत राहतील. या पेपरलीकविरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. पेपर चोर, गद्दी छोड, अशा घोषणा देत आहेत. ही केवळ तरुणांसाठी नोकरीची लढाई नाही तर न्याय आणि लोकशाहीची लढाई आहे. न्यायाच्या या लढाईत आपण प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणांसोबत ठामपणे उभा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, उत्तराखंड यूकेएसएसएससी पेपर लीक प्रकरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या तीन पानांचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला. डेहराडूनच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कारवाई करत हरिद्वार पोलिसांनी मुख्य आरोपी खालिद मलिकला अटक केली आणि त्याला डेहराडून अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी उत्तराखंड स्पर्धा परीक्षा (भरतीतील अन्याय्य साधनांचे नियंत्रण आणि प्रतिबंधक उपाय) कायदा, २०२३ अंतर्गत आधीच गुन्हा दाखल केला आहे.