पावसाच्या सुरावटीवर पाऊसराग अनुभवूया

सामना प्रतिनिधी । मुंबई

नव्या आणि उभारत्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमंग’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज एनसीपीएच्या लिटिल थिएटरमध्ये सायंकाळी ६.३० वाजता तरुण गायक नागेश आडगावकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या आणि बासरीवादक देबोप्रिया चॅटर्जी आणि सुश्मिता चॅटर्जी वेगवेगळे राग बासरी, पखवाज आणि तबला या वाद्यांच्या आधारे आळवून रसिकांना आनंदाची अनुभूती देणार आहेत.

या कार्यक्रमाविषयी देबोप्रिया सांगते की, उमंगमध्ये पखवाज आणि तबल्याच्या साथीने आम्ही सादर केलेल्या बंदिशी हेच या मैफिलीचं अनोखं वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ उस्ताद रशिद खान यांच्या गरुकुलातील शिष्यांचाही यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे नव्या कलाकारांसमोर आपली गानकला उत्तमरित्या पेश करणे ही आमची जबाबदारी आहे, कारण गुरुकुलात संगीत शिकणारे विद्यार्थी अशा कार्यक्रमातूनच शिकत असतात.

वेगवेगळ्या वेळी आणि ऋतुत गायले जाणारे राग हे संगीताची महानता आहे. रागांचे अनोखेपण वेगळे उलगडून सांगण्याची गरज नसते. जेव्हा व्यक्ति ते राग ऐकते तेव्हा त्या रागांचा तिच्यावर परिणाम होऊन ते तिला भावतात. यामुळे ते कोणत्या ऋतुशी संबंधित आहेत हे वेगळे सांगावे लागत नाही. मल्हार रागाचे अनेक प्रकार पावसाळ्यात गायले जातात, असे ती पावसाळा ऋतुत गायल्या जाणाऱ्या रागांविषयी सांगते. नवोदित गायक नागेश आडगावकर या मैफिलीत पहिल्यांदाच आपली कला सादर करणार आहेत. राग मारु बिहाग आणि बागेश्री या रागातील पावसाळ्याशी संबंधित असणाऱ्या बंदिशी ते रसिकांना ऐकवणार आहेत.

वर्षा ऋतूचा आनंद देणारे राग

कजरी, सावनी, झुला मारुबिहाग, बागेश्री, मेघमल्हार, प्रियामल्हार असे काही राग पावसाळ्यात गायले जातात. ‘कजरी म्हणजे काजळ’. काजळ जसं असतं तसेच पावसाळी काळ्या ढगांसारखा एखाद्या प्रियकर किंवा प्रेयसीचा विरह दाटून आल्याचं वर्णन कजरीमध्ये असतं. काही मिर्झापुरी कजरींमध्ये पावसाळ्याचा आनंद व्यक्त केलेला असतो. ‘सावनी’ या रागात वर्षा ऋतुचं सुंदर आणि मोहक वर्णनाबरोबर मानवी भावना व्यक्त केल्या आहेत, तर ‘झुला’राग स्त्रीया पावसाळ्यात झोपळ्यांवर खेळताना गातात. यामधून शृंगाररस व्यक्त होतो. शिवाय कृष्ण-राधा आणि श्रीराम या दैवतांची वर्णनेही यामध्ये आढळतात.