
नोव्हेंबर महिन्यात कश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. जगात इतरही अनेक मुद्दे आहेत असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील ब्रिटनच्या प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षा केरन पियर्स यांनी याबाबत सांगितले की, सध्या जगात अनेक विविध प्रकारचे मुद्दे आहेत. कश्मीर मुद्द्यावर याआधी बरीच चर्चा झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये या विषयावर चर्चा होणार नाही.
नोव्हेंबर महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या टॉप 15 देशांपैकी ब्रिटनला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केरन पियर्स यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सीरियातील पत्रकाराने कश्मीर मुद्दय़ावर चर्चा होणार की नाही याबाबत पियर्स यांना प्रश्न विचारला होता त्यावर पियर्स यांनी उत्तर दिले. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी हिंदुस्थान सरकारने ‘370’ आणि ‘35 अ’ कलम हटवल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला. हा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठेवला, परंतु चीन आणि तुर्कस्तानशिवाय कुणीच या मुद्दय़ावर पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही, तर दुसरीकडे कश्मीरचा मुद्दा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय आहे. त्यामुळे इतर कुणीही त्यात तोंड घालण्याची गरज नसल्याचे हिंदुस्थान सरकारने स्पष्ट केले होते.
सुरक्षा परिषदेच्या सदस्यांकडूनही चर्चेची मागणी नाही
कश्मीर मुद्दय़ावर अलीकडे बरीच चर्चा झाली होती. तसेच सुरक्षा परिषदेच्या एकाही सदस्याकडूनदेखील याप्रकरणी चर्चेची मागणी करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या शेडय़ुलमध्ये या विषयाचा समावेश करण्यात आला नसल्याचेही केरन पियर्स यांनी सांगितले.


























































