पराभव सहन न झाल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंची हिंदुस्थानी खेळाडूंना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसर्‍या फेरीत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. शनिवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी गोल केले.

मात्र हिंदुस्थान विरुद्धच्या सामन्यात झालेली हार अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले. पराभवानंतर त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते थेट हिंदुस्थानी खेळाडूंशी भिडले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचे 3 खेळाडू आणि हिंदुस्थानी संघाचे 2 खेळाडूंसोबत हाणामारी करताना दिसत आहेत.

भारताचा स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग हे प्रकरण शांत करण्यासाठी पुढे आला. परंतु त्याला देखील अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी धक्कबुक्की केली. एएफसीचे अधिकारी मैदानावरील खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

जानेवारी 2016 नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय होता. यापूर्वी दोन वेळा अफगाणिस्तानच्या संघाला हिंदुस्थानने दोनदा बरोबरीत रोखले होते. एकूणच हिंदुस्थानी संघ अफगाणिस्तानविरुद्ध 11 सामने खेळला आहे. ज्यात अफगाणिस्तानने सात सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर हिंदुस्थानी कर्णधार सुनील छेत्रीने 128 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 82 गोल केले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत आणि मेस्सीने 162 सामन्यांमध्ये 86 गोल केले आहेत.