पर्यटकांना बेकायदेशीररित्या दुचाकी भाड्याने देणार्‍यांवर कारवाईची मागणी

488
bike-lay-copy

पर्यटकांना बेकायदेशीररित्या दुचाकी भाड्याने देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मालवण शहर पंचक्रोशी रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिकांनी मालवण पोलिसांना निवेदन सादर केले.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक ही बाब वाहतूक पोलिसांच्या अखत्यारित असल्याने याबाबतचे निवेदन जिल्हा वाहतूक पोलिसांना द्यावे अशी सूचना केली.

शहर, पंचक्रोशीतील परवानाधारक तीन आसनी रिक्षा व्यावसायिक नियमितपणे रिक्षा परवाना, नूतनीकरण करणे, आरटीओ कार्यालयाकडे कर भरणे, व्यवसाय कर, रिक्षा पासिंग करणे याची पूर्तता वेळच्यावेळी करून कायदेशीररित्या व्यवसाय करत आहोत. रिक्षाने प्रवासी वाहतूक करून आम्हास मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नातून आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या व्यवसायाव्यतिरिक्त आम्हाला अन्य उत्पन्नाचे साधन नाही. शहर, वायरी, तारकर्ली, देवबाग, पंचक्रोशी येथे हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यानिमित्ताने आम्हाला पर्यटक प्रवासी उपलब्ध होतात. मात्र सध्या बेकायदेशीररित्या शहर व पंचक्रोशीत सर्वत्र खासगी दुचाकीचे मालक त्यांच्या अनेक दुचाकी पर्यटकांना भाड्याने वापरण्यास देत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

पर्यटकांना दुचाकी भाड्याने देण्याचे जाहीर फलकही शहर, पंचक्रोशीत लावण्यात आले आहेत. वैयक्तिक मालकीच्या दुचाकींचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी तसेच पर्यटकांना भाडेतत्त्वावर देण्याचा कायदेशीर परवाना शासनाने दिलेला नाही. असे असताना दुचाकी बेकायदेशीररीत्या पर्यटकांना भाड्याने प्रवासासाठी दिल्या जात आहेत. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना मिळणारे पर्यटक प्रवासी मिळेनासे झाले आहेत. परिणामी रिक्षा व्यवसाय डबघाईस आला असून आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय भरमसाट वाढलेला इन्शुरन्स, पासिंग, रिक्षाची देखभाल आदी करणे कठीण बनले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

malvan

आपली प्रतिक्रिया द्या