अनधिकृत फ्लेक्स : ‘संजय काळे’ यांच्या खडा सत्याग्रहाला यश, फ्लेक्स होर्डिंग उतरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगमुळे शहर विद्रूप होत असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 ते 11 पोलीस स्टेशन समोर उन्हात उभे राहून खडा सत्याग्रह केला. त्यांचा सत्याग्रह यशस्वी झाला असून पालिकेने तातडीने फ्लेक्स होर्डिंग उतरवले आहेत.

संजय काळे म्हणाले की, अनधिकृत होर्डिंगमुळे दिवसेंदिवस विद्रूप होणाऱ्या शहराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक मालमत्ता विद्रूप विरोध कायदा राज्यात अस्तित्वात आहे. त्याआधारे कारवाई करणे प्रशासनाला शक्य आहे. तसेच राजकीय दबाव झुगारून नगरपालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. शहरातील सर्व बेकायदा फ्लेक्स आणि होर्डिंग्ज तातडीने काढून टाकावेत, फ्लेक्स आणि बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि असे फ्लेक्स, होर्डिंग आणि बॅनर काढून टाकण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

संजय काळे यांच्या सत्याग्रहाला उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी भेट दिली व तातडीने फ्लेक्स बोर्ड होल्डिंग काढण्याचे काम नगरपालिकेने सुरू असल्याचे सांगितले व मुख्याधिकारी यांना विचारून संबंधिताविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या ठिकाणी उपस्थित झालेले शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी संजय काळे यांची मागणी योग्य असून नगरपालिकेने फिर्याद दिल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन संजय काळे यांना दिले यानंतर संजय काळे यांनी सत्याग्रह मागे घेतला.

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पोलीस स्टेशन समोर उभा राहून केलेल्या खड्या सत्याग्रह आंदोलनास यश आले असून कोपरगाव शहरातील गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक श्री साईबाबा तपोभूमी चौक येवला नाका या सर्व ठिकाणी असलेली मोठमोठाले होल्डिंग पालिकेने तातडीने काढून घेतली आहेत.