19 वर्षांखालील एकदिवसीय तिरंगी क्रिकेट मालिका – हिंदुस्थान ‘ब’ संघाचा अफगाणवर विजय

वेदांत त्रिवेदीच्या 83 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘ब’ संघाने मंगळवारी तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत अफगाणिस्तानवर 2 गडी राखून विजय मिळविला. या स्पर्धेत हिंदुस्थान ‘ब’ संघाचा हा पहिला विजय ठरला. याआधी या संघाने अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्ध तिन्ही सामने गमावले होते.

अफगाणिस्तानकडून मिळालेले 203 धावांचे लक्ष्य हिंदुस्थान ‘ब’ संघाने 48.1 षटकांत 8 बाद 206 धावा करून पूर्ण केले. वेदांत त्रिवेदीने 112 चेंडूंत 11 चौकारांसह सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. याचबरोबर कर्णधार आरोन जॉर्ज (42), बी.के. किशोर (नाबाद 29) आणि दीपेश दीपेंद्र (नाबाद 20) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी करत हिंदुस्थान ‘ब’ संघाला 11 चेंडू आणि 2 फलंदाज राखून विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून नझीफुल्लाह अमिरीने 3 फलंदाज बाद केले, तर खातीर स्थानिकझाई व सलाम खान यांनी 2-2 बळी टिपले.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 9 बाद 202 धावसंख्या उभारली.