
विंडीज–द. आफ्रिकेचे भवितव्य ठरणार
मुशीर खानच्या झंझावाताने हिंदुस्थानच्या युवा संघाचे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केले आहे. आज केवळ औपचारिकता म्हणून सुपर सिक्समध्ये नेपाळशी गाठ पडणार आहे. नेपाळविरुद्ध हिंदुस्थान हरला तरी उपांत्य फेरी प्रवेशावर त्याचा काडीमात्र फरक पडणार नाही, हे हिंदुस्थानच्या नेट रनरेटने निश्चित केले आहे. दुसऱया गटातून ऑस्ट्रेलियाचीही उपांत्य फेरी निश्चित असल्यामुळे विंडीज किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एक संघ उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करेल. या दोघांपैकी एक संघ उपांत्य फेरीत हिंदुस्थानशी भिडेल, हेसुद्धा चित्र स्पष्ट झाले आहे.
आज हिंदुस्थान आपल्या सुपर सिक्समधील दुसरी आणि शेवटची लढत खेळणार आहे. नेपाळच्या नावावर एकही गुण नसल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जर उद्या नेपाळने चमत्कार दाखवला तरी हिंदुस्थानच्या नेट रनरेटला पाकिस्तान आणि बांगलादेश हे पार करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे उद्या 3 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणारी लढत दोघांचे भाग्य निश्चित करील. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला केवळ बांगलादेशला नमवायचे आहे, मात्र बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध मोठय़ा विजयाची नोंद करणे गरजेचे आहे. धावांचा पाठलाग करताना त्यांना विजयी लक्ष्य किमान दहा षटके आधी गाठावे लागेल किंवा पाकिस्तानचा 100 पेक्षा अधिक धावांनी पराभव करावा लागेल.
द. आफ्रिकेला उपांत्य फेरीची संधी
ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरी पक्की आहे आणि उद्या ते वेस्ट इंडीजशी भिडणार आहेत. सुपर सिक्सच्या ‘ब’ गटात उपांत्य फेरीचा फैसला नेट रनरेटच्या आधारे होणार असल्यामळे विंडीजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजय मिळवावाच लागणार आहे. बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मोठय़ा फरकाने मात करणे विंडीजसाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला जाणार आहे. लंकेचे स्पर्धेतील आव्हान संपल्यातच जमा आहे. मात्र विंडीज हरला आणि ते आफ्रिकेला मोठय़ा फरकाने हरवण्यात यशस्वी ठरले तर उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ श्रीलंकेचाही ठरू शकतो. पण या जर-तरची समीकरणे जुळून आली तरच हा चमत्कार घडू शकतो.























































