वाहतूककोंडी फुटणार, मुंबईत अंडरग्राऊंड पार्किंगचा मार्ग मोकळा

116

मुंबईतील उद्याने, मैदानांच्या खाली ‘अंडरग्राऊंड पार्किंग’ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीची मंजुरी मिळाली. यामध्ये विकासकाला बांधकामाच्या बदल्यात ‘टीडीआर’ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे हजारो वाहनचालकांना सुविधा मिळणार असून मुंबईची वाहतूक कोंडी फुटण्यासही मदत होणार आहे.

मुंबईत प्रत्येक दिवशी शेकडो वाहनांची भर पडत असल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवाय मोकळ्या जागा आणि उपलब्ध असणाऱया मर्यादित पार्किंगची व्यवस्थेमुळे वाहनचालकांना वाहन पार्क करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने महत्त्वाकांक्षी धोरण आखत विकास आराखडा 2034 मध्ये मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे व खुल्या जागांखाली एक किंवा दोन मजली वाहनतळ बांधण्यास परवानगी देण्याची शिफारस केली आहे. याबाबतचा प्रस्ताव आज सुधार समितीत मांडण्यात आला. यावेळी प्रस्ताव मंजूर झाल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी जाहीर केले.

पालिकेचा महसूल वाढणार
संबंधित ठिकाणी पार्किंग बांधण्यासाठी संपूर्ण खर्च विकासक करणार आहे. संबंधित भूखंडाची मालकी पालिकेच्या नावे करण्याची जबाबदारी विकासकाची राहील. यानंतर पालिका निविदा मागवून हे पार्किंग चालवण्यासाठी देईल. यातून पालिकेला महसूलही मिळणार असल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी सांगितले. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

विकासकांनाही फायदा
याआधी मोकळ्या जागा, उद्याने-मैदानांखाली वाहनतळ विकसित करावयाचे असल्यास 70 टक्के जागेत वाहनतळ बांधून पालिकेला हस्तांतरित करावे लागत होते, तर 30 टक्के जागा विकासकाला ऑफिस, खरेदी-विक्री केंद्रासाठी मिळत होती. मात्र नव्या धोरणात विकासकांना प्रोत्साहनपर टीडीआर किंवा एफएसआय मिळणार असल्यामुळे विकासकांचाही फायदा होणार आहे.

अशी आहेत वैशिष्टय़े
– वाहनतळ जमिनीखाली एक किंवा दोन मजल्यांचे असावे.
– योग्य नियोजनाकरिता भूखंडाचे क्षेत्रफळ किमान एक हजार चौ. मी. असावे. विशेष प्रकरणात आयुक्तांना बदल करण्याचे अधिकार.
– विकासकाला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 क्र.17 तळटीप 1 (डी) व 1 (ई) नुसार बांधीव सुविधेचे क्षेत्रफळानुसार विकास हक्क दिले जातील.
– वाहनतळात खेळती हवा आणि येण्या-जाण्यास सुयोग्य आणि सुरक्षित व्यवस्था, सांडपाण्याच्या निचऱयाची योग्य सुविधा असावी.
– वाहनतळाचे संपूर्ण बांधकाम भोगवटा दाखला दिल्यानंतरच पालिकेला हस्तांतरित करावे.

आपली प्रतिक्रिया द्या