
सामना प्रतिनिधी । मुंबई
माहीम नयानगर येथून जमिनीखालून भुयार खणत कृष्णा-1 आणि कृष्णा-2 या महाकाय टीबीएम मशीन्स गुरुवारी दादर शिवसेना भवन येथील मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्या. घुर्ररररर…असा प्रचंड आवाज करत या मशीन्स एकाच दिवशी जुळय़ा बोगद्यांमधून बाहेर पडल्या. त्यावेळी पाहणाऱयांनी टाळय़ा वाजवून त्यांचे स्वागत केले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गासाठी करण्यात येत असलेले हे भुयारीकरण आता 35 टक्के पूर्ण झाले आहे.
मेट्रो-3 हा मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. भुयारीकरणासाठी मुंबईत विविध ठिकाणी भूगर्भात 17 टीबीएम मशीन्स उतरवण्यात आल्या आहेत. कृष्णा-1 आणि कृष्णा-2 या दोन टनेल बोअरिंग मशीन्स (टीबीएम) अनुक्रमे 21 सप्टेंबर आणि 18 ऑक्टोबर रोजी माहीम नयानगर येथे भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. भूगर्भातील बेसाल्ट, टफ आणि ब्रेशियासारखे कठीण खडक भेदत त्या आज दादरला पोहोचल्या. प्रत्येक मशीन रोज 10-12 मीटर भुयार खणत होती.
कृष्णा-1 ने 2490 मीटर तर कृष्णा-2 ने 2472 मीटर भुयारीकरण केले. भुयारासाठी कृष्णा-1 या टीबीएमद्वारे 1779 आरसीसी सिमेंट रिंग्ज वापरल्या गेल्या तर कृष्णा-2 ने 1766 आरसीसी रिंग्ज वापरल्या. इंजिनीयर्स आणि कामगार अशी 100 जणांची टीम यासाठी कार्यरत होती.
मेट्रो-3 ठरलेल्या वेळेतच सुरू होईल
भुयारीकरणाच्या कामाची गती पाहता मेट्रो-3 मार्ग ठरलेल्या वेळेत मुंबईकरांच्या सेवेत आणू शकू असा विश्वास यावेळी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील भुयारीकरण पूर्ण झाले असून आतापर्यंत 18 किलोमीटरपर्यंत जास्त भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.




























































