
धावपळीच्या युगात आरोग्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. जीवनशैलीतील बदलामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आता व्यस्त जीवनशैलीच्या काळात तब्बल ‘४२.५ टक्के’ हिंदुस्थानी आपल्या आरोग्याला दुय्यम स्थान देतात अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
या सर्वेक्षणात ‘५७.८ टक्के’ लोकांनी मान्य केले की त्यांना त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे समजते, परंतु प्रत्यक्ष कृती करताना त्यांची ओढाताण होते. पीटीआयने या सर्वेक्षणाच्या आधारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आरोग्य विषयक जागरूकता आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील वाढते अंतर यामध्ये अधोरेखित होत आहे.
‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त ‘हॅबिल्ड’ (Habuild) या वेलनेस प्लॅटफॉर्मने केलेल्या डेटा-आधारित अभ्यासात, मेट्रो शहरांसह प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधील ५,००० हून अधिक व्यक्तींच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. या सर्वेक्षणात असेही आढळले की, ‘४६ टक्के’ लोक तंदुरुस्त राहण्यासाठी सक्रिय प्रयत्न करतात, परंतु सातत्य राखण्यात ते अपयशी ठरतात. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ९० टक्के महिला ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील होत्या, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.



























































