मी सतत आजारी असतो, त्यामुळे उर्वरित शिक्षा माफ करावी, अरूण गवळीची न्यायालयाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एके काळी अंडरवर्ल्ड डॉन म्हणून दगडी चाळीतल्या अरूण गवळीची मुंबईत मोठी दहशत होती. सध्या अरूण गवळी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु अलीकडे अरूण गवळी हा सतत आजारी असतो. त्यामुळे आता त्याने घरी जाण्यासाठी न्यायालयाकडे दया याचना केली आहे. अरूण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचकडे एक याचिका दाखल केली. यामध्ये त्याने आपल्याला फुफ्फुसं आणि पोटाचे विकार असल्यामुळे शिक्षा माफ करावी अशी मागणी केली आहे. अरूण गवळीने वयाची सत्तरी ओलांडली आहे. हायकोर्टाचे जज न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मनेजेस यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सरकारला नोटीस दिली आहे.

हत्येच्या प्रकरणात अरूण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने 2006 मध्ये एक सर्क्युलर काढलं होतं त्या सर्क्युलरचा हवाला देऊन अरूण गवळीने माफीची याचना केली आहे. त्या ऑर्डरमध्ये हे लिहिलं होतं की ज्या कैद्यांचं वय 65 वर्षे आहे आणि 14 वर्षांची शिक्षा भोगून झाली असल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल. याचा हवाला देत गवळीने आपली शिक्षा माफ करून तुरुंगातून सोडण्यात यावं असं म्हटलं आहे.

2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकार जामसांडेकर यांची विजय गिरी नावाच्या एका गुंडाने राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली होती. जामसांडेकर यांना ठार करण्याची ही सुपारी अरूण गवळीने दिली होती. याच प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 2008 मध्ये अरूण गवळीला याच हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा अरूण गवळी राज्याच्या विधानसभेत आमदार होता.