अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटीला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचा नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी वाहनं आणि पैसे उकळले होते. याच प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकानं रियाज भाटी याला अंधेरी परिसरातून अटक केली आहे. आज त्या रियाझ भाटीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रियाझ भाटी हा गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला गुंड असून त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक आणि गोळीबार अशा अनेक प्रकरणांमधील गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती.