ही तर लठ्ठ क्रिकेटपटूंची लीग, कोरोना व लॉकडाऊनमध्ये फिटनेसकडे कानाडोळा

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला शनिवारपासून यूएईतील अबुधाबीत सुरुवात झाली. दोन गतविजेत्यांमध्ये झालेल्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सला हरवून दमदार सुरुवात केली. मात्र या लढतीत एक बाब प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे कोरोना व लॉकडाऊनमध्ये बहुतांशी क्रिकेटपटूंनी आपल्या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. बऱयाच खेळाडूंचे वजन वाढलेय. काहींचे पोट पुढे आले आहे. या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत कुटुंबासोबत वेळ घालवताना त्यांनी शरीराकडे दुर्लक्ष केलेले प्रकर्षाने दिसून आले आहे.

दोन्ही कर्णधारांचे वजन वाढलेले

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांच्याही वजनात वाढ झालेली दिसून येत आहे. महेंद्रसिंग धोनी तब्बल 437 दिवसांनंतर मैदानात उतरलाय, त्यामुळे कदाचित या कालावधीत त्याने फिटनेसकडे लक्ष दिले नसेल. शिवाय 15 ऑगस्टला त्याने निवृत्तीही घेतलीय. पण आयपीएलमध्ये तो खेळणार आहे हे त्याला माहीत असूनही त्याने क्रीडापटू या नात्याने शरीराची काळजी घेतली नाही ही खेदजनक बाब. रोहित शर्मा तर हिंदुस्थानी वन डे संघाचा उपकर्णधार असूनही त्याने या गोष्टीकडे गंभीरतेने बघितले नाही.

पीयूष, सौरभ हे तर खेळाडू वाटतच नाहीत

चेन्नई सुपरकिंग्जचा लेगस्पिनर पीयूष चावला आणि मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज सौरभ तिवारी यांच्या वजनामध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. दोघांनीही प्रत्यक्षात स्पर्धेत उतरण्याआधी फिटनेसवर लक्ष दिले असेल असे अजिबात वाटत नाही. मुळात त्यांच्या शरीराकडे बघून ते खेळाडूच वाटत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचेही वजन वाढलेय हे विशेष.

जाडेजा, करण हे वाखाणण्याजोगे

युरोपमध्ये फुटबॉल लीग सुरू झालीय. इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झाले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंकडे लक्ष देता कोरोना आधी व नंतर त्यांच्या शरीरामध्ये जास्त बदल झालेला जाणवला नाही. पण इंडियन प्रीमियर लीगमधील पहिल्याच लढतीत हे जाणवले. अर्थात या लढतीत प्रत्येकाचेच वजन वाढलेले होते असे नाही. रवींद्र जाडेजा, सॅम करण यांनी फिटनेसवर लक्षणीय मेहनत घेतलेली दिसून आली.

आपली प्रतिक्रिया द्या