UP Election 2022 – दंगेखोर ‘सपा’ जातात, त्यांना पकडणारे भाजपत येतात!

‘दंगेखोर हे समाजवादी पक्षात जातात आणि त्यांना पकडणारे भारतीय जनता पक्षात येतात’ असं विधान केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. लखनऊ येथील भाजप कार्यालयात बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. माजी पोलीस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्या पक्षप्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना अनुराग यांनी हे विधान केले आहे. ठाकूर म्हणाले की ‘समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसून येईल की कैराना मतदारसंघातून त्यांनी नाहीद हसन यांना उमेदवारी दिली आहे. हसन हे जेलमध्ये आहेत. हसन यांच्याव्यतिरिक्त सपाने अब्दुल्ला आझम यांना उमेदवारी दिली आहे. आझम हे सध्या जामिनावर असून समाजवादी पक्षाचा ‘जेल-बेल’चा खेळ सुरू आहे.’

नाहीद हसन यांना अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी हसन यांच्याविरोधात गुंडा अॅक्टनुसार कारवाई केली आहे. हसन हे कैरानामधून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अब्दुल्ला हसन हा आझम खान यांचा मुलगा असून ते शनिवारीच तुरुंगातून सुटले आहेत.

असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत म्हटले की त्यांची विचारप्रक्रिया ही इतरांपेक्षा वेगळी आहे. नवं नेतृत्व घडवणं ही भाजपची खासियत आहे असं असीम अरुण यांचं म्हणणं आहे. असीम अरूण यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपण या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने चौकशी केली नाही तर मग मोठा प्रश्न उभा राहील असं अखिलेश यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणे काम करत असल्याचं आम्हाला वाटत नाही असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.