
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकमधील प्रस्तावित बदलांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नव्या डिझाईननुसार 1799 कांदळवनांवर कुऱ्हाड चालवावी लागणार असून काही लेन कमी होणार आहेत. असे असताना या प्रकल्पाचा खर्च 11 हजार 332.82 कोटींवरून 60 टक्क्यांची वाढ होऊन 18 हजार 120.96 कोटींवर गेला आहे. म्हणजेच प्रकल्प खर्चात 6 हजार 788.14 कोटींची वाढ झाली आहे.
कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात वांद्रे सी-लिंक ते वर्सोवा असा हा मार्ग महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमएसआरडीसी) बांधण्यात येत आहे. या मार्गासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून ‘सीआरझेड’ची मंजुरीही प्राप्त झाली आहे. मात्र आता या प्रकल्पात काही लेन कमी करणे आणि 1585 ऐवजी 1799 कांदळवने तोडणे आदी बदल सुचवण्यात आले आहेत. या बदलांमुळे प्रकल्प खर्चातही वाढ झाली आहे.
हा तर ‘एमएसआरडीसी’मधील सर्वात मोठा भ्रष्टाचार – आदित्य ठाकरे
वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्प खर्चात झालेल्या वाढीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘एक्स’वर ‘स्पॅम अलर्ट’ अशी टॅगलाईन देत वांद्रे-वर्सोवा प्रकल्पात झालेली खर्चवाढ म्हणजे एमएसआरडीसीमध्ये आतापर्यंत झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. लेन कमी, जास्त कांदळवने हटवली जाणार आहेत. हा विकास आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.
असा आहे मार्ग
एकूण 17.7 किमी लांबीचा वांद्रे-वर्सोवा मार्ग आठ लेनचा असेल. या प्रकल्पाचे नामकरण ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकर असे करण्यात आले आहे. यामध्ये एकूण चार कनेक्टर राहतील.
यामध्ये वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा आणि वर्सोवा यांचा समावेश आहे. प्रकल्पाचे सध्या 30 टक्के काम झाले असून 2028मध्ये हा रस्ता सेवेत येण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे वांद्रे ते वर्सोवा हा एक तासाचा प्रवास 15 मिनिटांत होणार आहे. या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून पुढे कोस्टल रोड ते थेट दहिसर-भाईंदरपर्यंत केली जाईल.




























































