
इच्छापर्तीसाठी अनेकजण नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याची पूर्तताही करतात. परंतु, काही आगळेवेगळे नवसही पाहायला मिळतात. लग्नानंतर एकवीस वर्षांनंतर मुलगा झाल्याने एका दाम्पत्याने पाळण्यातून आपल्या मुलाला कृष्णामाईच्या वाहत्या पाण्यातून एका घाटावरून दुसऱ्या घाटावर नेत ही अनोखी परंपरा पूर्ण केली. कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या तरुणांनी मोठ्या धाडसाने हे शिवधनुष्य पेलले. नौकानयनप्रमाणे पाळणानयन झालेल्या सांगली जिल्ह्यात ही श्रद्धा की अंधश्रद्धा याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
कर्नाटकातील निपाणी गावात राहणारे रवींद्र वळावे या दाम्पत्याला वीस वर्षे होऊनही मूल होत नव्हते. यासाठी सर्व वैद्यकीय उपचार घेऊनही त्याला यश आले नाही. रवींद्र वळावे यांचे आजोळ हे सांगली. या आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पूर्वापार चालत असलेल्या या परंपरेबाबत माहिती दिली. त्यानंतर वाळवे दाम्पत्यानं सांगलीमध्ये येऊन चार वर्षांपूर्वी मूल होण्यासाठी नवस बोलला होता.
यानंतर त्यांना एक मुलगा झाला. यानंतर हे दाम्पत्य परंपरचे पालन करण्यासाठी कुटुंबीयांसह सांगलीतील सरकारी घाटावर आले होते. यासाठी कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजातील तरूणांच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला. कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात वीर या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आले. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट, असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत या परंपरेचे पालन करण्यात आले.
कोयना धरण क्षेत्रासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. असे असले तरीही आंबी समाजाच्या तरुणांनी मोठ्या धाडसाने वाहत्या पाण्यात नवस फेडण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.
आंबी समाजाची मदत घेण्याची प्रथा
यावेळी आंबी समाजातील तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल होत नसेल तर त्यांनी हा नवस बोलण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी आंबी समाजाच्या मदतीने पूर्ण करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा क्वचितच काहीजणांना माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.