
विजय जोशी, नांदेड
स्पर्धेच्या जगात आपलं वेगळंपण जपणे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेणे, त्यातून हुरळून न जाता मेहनतीने आपल्या कलेला चांगल्या पद्धतीने पुढे नेल्यास या कलाक्षेत्रात माणूस यशस्वी होतो. आयुष्यात याच बाबीला मी जास्त महत्त्व देऊन आपलं वेगळेपण जपले आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून व कार्यक्रमातून हे वेगळेपणे रसिक, प्रेक्षकांना बघायला मिळाले आहे, अशा भावना प्रख्यात दिग्दर्शक व गायक अवधूत गुप्ते यांनी सामनाशी बोलतांना व्यक्त केल्या.
आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी अवधूत गुप्ते यांचे आगमन झाले. त्यावेळी या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. बालपणापासूनच संगीताकडे आकर्षित झालो, अडगळीत पडलेली आजीची पेटी बाहेर काढली आणि पेटी वाजवायला शिकलो, अनेकांनी ते बघितले आणि मग शाळेत हार्मोनियम मास्टर म्हणून माझी ख्याती होऊ लागली. पेटी वाजवायची मग अवधूतला बोलवा, असाच एक पायंडा पडू लागला. त्यामुळे महाविद्यालय जीवनात मी पेटीला थोडे बाजूला केले आणि आपले संगीत, नाट्य व दिग्दर्शनाच्या कलेला हळूहळू वाव देण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावरील एकांकीका, नाटिका, संगीत कार्यक्रम व विविध स्पर्धांच्या माध्यमातून सहभाग नोंदवू लागलो, अशा शब्दांत गुप्ते यांनी आपल्या कलेच्या आवडीबद्दल सांगितलं.
संगीत क्षेत्रातील आपल्या स्ट्रगलविषयी बोलताना गुप्ते म्हणाले की, मुंबईमध्ये तसे चित्रपट आणि संगीत या दोन्हीमध्ये प्रचंड स्पर्धा. मात्र अशा स्पर्धेत आपला निभाव लागेल की नाही हे वाटत असतानाच मी मनाशी ठरवले की, आपण सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळे द्यायचे, तरच आपले वेगळेपण या क्षेत्रात सिध्द होईल. म्हणून सुरुवातीला ऐका दाजीबाच्या माध्यमातून अल्बमची सुरुवात झाली. आणि आज अनेक अल्बम माझे आले आहेत. चित्रपटांचे दिग्दर्शन मी केले आहे. काही गाणी देखील मी लिहिली आहेत. या प्रत्येक गाण्यांचा अभ्यास केला तर त्यात मी माझे वेगळेपण जपले, त्यामुळेच या स्तरापर्यंत येऊन पोहंचलोय. शिवसेनेसाठी लिहिलेले आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान……शिवसेना, शिवसेना… हे गीत मी लिहिण्यासाठी बसलो, असं मनोगत गुप्त यांनी व्यक्त केलं.
शिवसेनेशी निगडीत आपल्या आठवणी सांगताना गुप्ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांची परवानगी घेतली आणि आशीर्वाद घेतला. एखादी कविता किंवा गीत लिहिताना मला तीन दिवस लागायचे. मात्र शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने एका रात्रीतूनच हे शिवसेना गीत तयार झाले. हा एक माझ्या आयुष्यातील चमत्कारच आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. कुठल्याही कलावंताला परिश्रमाशिवाय पर्याय नाही, आज अनेक संस्था यासाठी निघाल्या आहेत. त्यातील निवड करुन मेहनत करा, नाव कमवा अशा शब्दात त्यांनी मराठवाड्यातील कलावंतांना पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत, काहींचे म्हणणे हे पूर्णपणे द्यावे तर काहीचे देऊ नये असे मत आहे. मात्र काही मंडळी केवळ अनुदानासाठी चित्रपटांची निर्मिती करतात. त्याला माझा विरोध असून, त्यामुळे अशा अनुदानांची गरज कशासाठी, असा माझा सवाल आहे. गेल्या दोन-तीन वर्षात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र त्यापैकी अनेकांनी केवळ पैसे कमविण्यासाठी सरकारचे अनुदान उचलले, अशा पद्धतीला माझा विरोध असल्याचे गुप्ते यांनी सांगितले.

































































