इतिहास घडला! पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध

सामना प्रतिनिधी । संयुक्त राष्ट्रे

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड आहे, असे सांगतानाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या नावानिशी त्या हल्ल्याचा आज निषेध केला. इतकेच नव्हे तर अशा हल्ल्यांमागील सूत्रधारांना कठोर शिक्षा दिली पाहिजे असा आग्रहसुद्धा सुरक्षा परिषदेने धरला. हिंदुस्थानी जवानांवरील दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निषेध करणे हे इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. मात्र चीनच्या विरोधामुळेच पुलवामाच्या हल्ल्यावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निषेध निवेदनाला आठवडाभराचा विलंब झाला असे सूत्रांकडून समजते.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनसहित 15 देशांचा समावेश आहे. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने काढू नये यासाठी पाकिस्तानने चीनच्या मार्फत आटोकाट प्रयत्न केले, मात्र अमेरिकेने पुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी परिषदेतील सर्व सदस्यांची सहमती मिळवण्यासाठी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे पाकिस्तान, चीनचे प्रयत्न हाणून पाडले गेले.

पाकिस्तान, चीनने आटापिटा कसा केला?

  • संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांची भेट घेतली.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे निषेधाचे पत्रक पुलवामा हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी 2019 रोजीच प्रसिद्ध होणार होते. 14 देशांची त्यावर सहमती होती.
  • चीनने 18 फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला. नंतर निषेध पत्रक लांबणीवर पडण्यासाठी दोन वेळा बदल सुचवले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनच सतत खोडा घालत आला आहे.