
कर्जत येथील पदवी व पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रीमिअर व्यावसायिक शिक्षण संस्था असलेल्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूलतर्फे प्रोजेक्ट पनाह (यूबीएस एनॅक्टसचा उपक्रम) सुरू करण्यात आला. या अंतर्गत, ऑगस्ट 2020 मध्ये कोव्हिड-19 ची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावलेली असताना युनिव्हर्सल बिझनेस स्कूलमधील 8 विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही कमी किमतीचे फेस मास्क तयार करण्यासोबतच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी हा शाश्वत व्यावसायिक प्रकल्प सुरू केला.
बीज भांडवलासाठी प्रोजेक्ट पनाहने मिलाप या वेबसाइटच्या मदतीने टीम सदस्यांच्या प्रयत्नांनी रु.27,060 इतकी रक्कम उभारली आणि त्यातून उत्पादन व कामकाज सुरू झाले. विद्यार्थी मार्केटिंग (डिजिटल व प्रत्यक्ष), लॉजिस्टिक्स, ग्राहक संबंध, सहयोग आणि वित्त हे सर्व पैलू हाताळण्यात सुरुवातीपासूनच सहभागी होते. सध्या या प्रकल्पांतर्गत 30 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. या महिला पर्यावरणस्नेही फेसमास्क तयार करतात आणि त्याबद्दल त्यांना न्याय्य मोबदला दिला जातो.
“पनाह हा सस्टेनेबिलिटी क्षेत्रातील आमचा पहिलावहिला प्रकल्प आहे. आम्ही हा प्रकल्प सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील कर्जतची निवड केली कारण तो अत्यंत व्यवहार्य पर्याय होता. महाराष्ट्र हे कोव्हिडचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेल्या राज्यांपैकी एक राज्य होते आणि या साथीमध्ये लोकांचे संरक्षण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते.”, असे एनॅक्टस यूपीएसच्या अध्यक्ष चांदसी
शर्मा म्हणाल्या.
“युनिव्हर्सल बिझनेस स्कूलमधील विद्यार्थी चाकोरीबाहेरील सस्टेनेबल व्यवसाय स्थापन करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या व्यवसायांचा समाजाला फायदा व्हावा आणि या माध्यमातून उदयोन्मुख उद्योजक व नेतृत्वाला चालना मिळावी हा हेतू आहे.”, असे युनिव्हर्सल बिझनेस स्कूलमधील एनॅक्टसच्या संशोधन संचालक व फॅकल्टी प्रमुख डॉ. आशा भाटिया म्हणाल्या.




























































