
उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगर याचं आमदार पद रद्द करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे प्रमुख सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.
या अधिसूचनेनुसार, 20 डिसेंबर 2019 रोजी बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण आणि पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये कुलदीप सेंगर याला न्यायालयाने दोषी मानत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याच दिवसापासून सेंगर याचं आमदारपद रद्द झालं असून उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभेच्या जागेला रिक्त जागा घोषित करण्यात आलं आहे.
उन्नाव येथे 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला आमदाराला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी आणि भाजपातून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
























































