तिला मरायचं नव्हतं…उन्नाव पीडितेची झुंज अपयशी!

466

सुमारे 40 तासांपर्यंत ‘ती’ मृत्यूशी झुंज देत होती, पण दुर्दैवाने तिची झुंज अपयशीच ठरली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. 90 टक्के शरीर भाजलेले, अंगाचा दाह होत होता तरीही तिने जगण्याची आशा सोडली नव्हती. ‘मी वाचेन ना?’ असे आपल्या भावाला सारखे सारखे विचारत होती. ‘मला मरायचे नाही’ असेही विनवत होती… ती मृत्यूला नाही जिंकू शकली. डॉक्टरांनी तिच्या मृत्यूचे कारण सांगितले… कार्डिऍक ऍरेस्ट!

उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गावातीलच शिवम या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलही केले. तिच्यावरील अत्याचाराची कहाणी येथूनच सुरू झाली. नंतर 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम याने आपल्या मित्रासह तिच्यावर बलात्कार केला. रायबरेली कोर्टात केस दाखल झाली. शिवमने कोर्टात शरणागती पत्करली. 30 नोव्हेंबर 2019 रोजी तो जामिनावर सुटला आणि 5 डिसेंबर 2019 रोजी रायबरेली कोर्टात जाणाऱया तिला त्याने गाठले. पाच जणांनी मिळून तिला जिवंत जाळले. पोलिसांनी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश वाजपेयी या पाच नराधमांना अटक केली आहे.

प्रियंका गांधी यांनी घेतली भेट
पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभेबाहेर धरणे आंदोलन सुरू केले असून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. गुन्हेगारांचे भाजपशी संबंध आहेत म्हणूनच त्यांना वाचवले जात असल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंका यांच्यानंतर भाजप खासदार साक्षी महाराज, मंत्री कमला रानी आणि स्वाती प्रसाद मौर्य हेसुद्धा त्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहचले; मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

घर आणि 25 लाख
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना घर आणि 25 लाखांची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून या तरुणीच्या कुटुंबीयांना घर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

त्यांनाही गोळ्या घाला
ही भयानक घटना उजेडात येताच अवघा देश हादरला. त्या पीडितेवर तातडीने सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू झाले, पण दुर्दैवाने काल तिचा मृत्यू झाला. हैदराबाद प्रकरणात जसा न्याय मिळाला तसाच न्याय माझ्या मुलीला मिळायला हवा. त्या पाचही नराधमांना गोळय़ा घाला, अशी संतप्त मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. मृत्यूच्या बदल्यात मृत्यू हाच न्याय व्हायला हवा. ठार मारा त्यांना. पुढे जी लढाई होईल ती मी लढेन, असा संताप तिच्या बहिणीने व्यक्त केला आहे. बलात्कारपीडित तरुणीचे कुटुंब या प्रकरणाने उद्ध्वस्त तर झालेच आहे; पण गुन्हेगारांना कदापि सोडणार नाही असेही त्यांनी ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या