असुरक्षित सेक्स केल्याने जडू शकतात हे भयंकर आजार, जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

लैंगिक संक्रमणातून होणारे आजार ही एक गंभीर समस्या आहे. कारण, असुरक्षित शारीरिक संबंधांतून याचा फैलाव जास्त होतो. 2020मध्ये देशभरातले 3 कोटी नागरिक लैंगिक आजारांनी ग्रस्त असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. यातील काही आजार जीवघेणेही ठरू शकतात.

हे आजार पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे यावर जास्त बोललं जात नाही. पण, या आजारांविषयी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी स्त्रियांना याचा विशेष धोका असतो.

महिलांची जननांगे अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना हा धोकाही अधिक असतो. जर वेळीच इलाज केला गेला नाही तर संसर्ग पसरून गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासोबतच असुरक्षित लैंगिक संबंध टाळण्यासाठी कॉन्डोमसारख्या गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

लैंगिक संक्रमणातून तब्बल 35 प्रकारचे आजार जडू शकतात. यात ह्युमन पॅपिलोमावायरस हर्पीज, सिफलिस, हेपेटायटिस, गोनोरिया, क्लॅमायडिया आणि गंभीर म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस अर्थात एचआयव्ही सारखे आजार आहेत. यातील अनेक आजार हे फक्त लैंगिक संबंधातूनच नाहीत तर रक्तातूनही पसरतात.

लैंगिक संक्रमणामुळे वंध्यत्वाचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे लैंगिक आजार लक्षात आल्यानंतर त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असतं. यातील काही आजार हे महिलांच्या अंडाशय आणि फिलोपियन ट्युबवर प्रभाव टाकतात त्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं उचित ठरतं.

यातील काही आजारांची लक्षणं अजिबात दिसत नाहीत. त्यात हर्पीज आणि क्लॅमायडिया सारख्या आजारांचा समावेश आहे. खाज येणं, जळजळ होणं ही सामान्य लक्षणं असली तरी बऱ्याचदा या आजारात ती दिसत नाहीत. त्यामुळे एकापेक्षा जास्त जणांशी लैंगिक संबंध असणाऱ्यांना हा धोका लवकर जाणवत नाही.

लैंगिक आजारांचा प्रभाव नवजात बाळावरही पडू शकतो. गर्भातील बाळावर देखील एचआयव्ही सारखे आजार हल्ला करू शकतात. काही आजारांमुळे मूल जन्माला येतेवेळी खूप गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे लक्षण दिसली नाहीत, तरी गर्भवतींनी अशा आजारांची चाचणी करणं गरजेचं असतं.

आपली प्रतिक्रिया द्या