
कोकणात यंदा परिसरातील बहुतांश शेतकऱ्य़ांचे गवत कुजून गेल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे सुका चारा खराब झाल्याने गुरांना खायला देणार काय असा प्रश्न शेतकऱ्य़ांसमोर उभा राहिला आहे. यामुळे गवताचा बाजारभाव वाढणार असल्याने शेतकऱ्य़ांना गुरांचे पोट भरण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
यंदा खरीप भात कापणीच्या काळात अनेकदा अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकऱ्य़ांना गवत वाळवणे शक्य झाले नव्हते. कापलेले भात गोळा करून त्याची झोडणी करावी की, वैरणीचे गवत वाळवावे असा प्रश्न शेतक्रयांसमोर होता. त्याही परिस्थितीत गवत वाळविण्याचा प्रयत्न करावा तर सततच्या पावसामुळे ते शक्य होत नव्हते. बहुतांश शेतकऱ्य़ांना पावसाळी वातावरणातच भात कापणीची कामगत उरकून घ्यावी लागली होती.
कडवले येथील अनेक शेतकऱ्य़ांनी भात कापणी करून सरल्याच्या पेंडया वाफ्यात रचून ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे त्या वाळवता आल्या नाहीत. परिणामी सरल्याच्या पेंड्या कुजून गेल्यामुळे पुढील काळात वैरणीच्या गवताची टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणीसाठी गवत हाच मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे पुढील काळात जनावरांचे संगोपन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्य़ांना पडला आहे.






























































