हिंगोलीत सायरन वाजल्याने चोरटयांचा डाव फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शहरातील शास्त्रीनगर भागामध्ये आज शनिवार १ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव सायरन वाजल्यामुळे फसला. मुंबई व नागपुरातून हिंगोली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे चोरटे पसार झाले असुन सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

हिंगोली शहराच्या शास्त्रीनगर भागात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम आहे. आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरटे या एटीएम मध्ये घुसले. त्यावेळी चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरु केला. एटीएम सोबत छेडखानी होत असल्याने सायरन वाजुन ही माहिती बँकेच्या मुंबई येथील यंत्रणेकडे पोहचली. मुंबई येथून नागपूर कार्यालयाला संपर्क साधण्यात आला. त्यानंतर नागपुर कार्यालयाने हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला माहिती कळविल्यावर त्यांनी तातडीने शहर पोलिसांना ही माहिती दिली. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याची चाहुल लागल्यावर अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या एटीएमला भेट देवुन पाहणी केली. याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजे पर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.