वादळी पावसाने चार राज्यांत 50 जणांचा मृत्यू; आंबा-फळबागा पिकांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
untimely-rail-hits

सामना ऑनलाईन । जयपूर/भोपाळ

वादळी वाऱ्यासह आलेला अवकाळी पाऊस आणि वीज कोसळल्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाने काढणीसाठी आलेल्या खरीप पिकांसह, द्राक्ष, डाळिंबाच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. कोकणसह अनेक भागांत आंबा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या आठवडय़ापासून देशाच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस बरसतो आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

राजस्थानात 25 जण ठार

वादळवारे आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने राजस्थानात सर्वाधिक हानी झाली आहे. 25 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जनावरेही मृत्युमुखी पडल्याची माहिती राजस्थान सरकारच्या आपतकालीन विभागाचे सचिव ए. टी. पेडणेकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये 10 तर महाराष्ट्रात 3 जण ठार झाले आहेत.

केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यांना मदत दिली आहे. सरकारचे परिस्थितीवर लक्ष आहे, असे केंदीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.