
कानपूरमध्ये कोरोना प्रादूर्भाव वेगानं सुरू आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यासारखी परिस्थिती आहे. अशातच सोमवारी रात्री जिल्ह्याधिकाऱ्याच्या ( डीएम ) कारवाईने कानपूरच्या सरकारी डॉक्टरांमध्ये संपात व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी कोरोना अभियानाशी जोडलेल्या डॉक्टर नीरज सचान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करत त्यांना अटक केली आहे.
डॉक्टर नीरज सचान, पतारा सीएचसी हॉस्पिटलचे इंचार्ज होते. दोन दिवस आधीच त्यांना कोरोना रॅपिड रिस्पोंस टीमचे इंचार्ज करण्यात आले होते. रविवार सुट्टी होती, सोमवारी डीएमने कोरोना कंट्रोलची बैठक बोलवावली होती, ज्यामध्ये डॉक्टर नीरज सहभागी झाले होते. या बैठकीतच डीएम आलोक तिवारी यांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीने जबाबदारी सांभाळली नसल्याचे आरोप केले आणि त्यांना अटक केली.
रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पोलीस ठाण्यात डॉक्टर नीरज सचान यांच्याविरोधात साथरोग कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेची माहिती मिळताच शहरातील सरकारी डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईचा विरोध केला.
या दरम्यान, सिटी मॅजिस्ट्रेट हिमांशु गुप्ता आणि डीसीपी देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मात्र संपूर्ण कानपूरमधील परिस्थितीला एकटा इन्चार्ज जबाबदार कसा? या डॉक्टरांच्या प्रश्नाला कुणीही उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे.
अटकेत असलेले डॉक्टर नीरज सचान यांचे म्हणणे आहे की, बैठकीदरम्यान सुरू असलेल्या चर्चेत जिल्हाधिकारी साहेबांना मी माझा मुद्दा समजावू शकलो नाही. मी त्यांना म्हणालो होतो की जबाबदारी मिळून अवघे दोन दिवस झाले आहेत, अजून आम्हाला पुरेसा वेळही मिळालेला नाही. आणखी दोन-तीन दिवस द्या आम्ही योग्य ती पावलं उचलतो. मात्र ते माझी बाजू ऐकून घेण्यास तयार नव्हते. माझ्याकडे पतारा सीएचसीची देखील जबाबदारी होती.
अटकेत असलेल्या डॉक्टर नीरज सचान यांचं म्हणणं आहे की मी माफी देखील मागितली, मात्र त्यांचे (डीएम) म्हणणं होतं की हे योग्यपद्धतीने काम करू इच्छित नाही, त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, त्यानंतर बैठक संपली आणि मला तात्काळ अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं.





























































