
सामना ऑनलाईन। वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, जदयू अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह ‘एनडीए’तील घटक पक्षांचे नेते, तसेच भाजपचे नेते उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱयांदा वाराणसीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.
2014 ला त्यांचा तब्बल 3.37 लाख मतांनी विजय झाला होता. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांचा वाराणसीमध्ये जबरदस्त रोड शो झाला होता. काशिविश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर गंगा महाआरतीही केली होती. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घरांच्या छपरावरून, बाल्कनीतून नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
प्रत्येकाने मतदान करावे – पंतप्रधान
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘मीडिया’शी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काही लोकांकडून असे वातावरण तयार केले जात आहे की, मोदी आधीच निवडून आलेत; त्यामुळे आता मतदानाची गरज नाही. कृपया अशा ट्रॅपमध्ये अडकू नका. मतदान हा जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे.
मोदींनी केले प्रकाशसिंग बादल यांचे चरणस्पर्श
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांची हस्तांदोलन करीत भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांचे वाराणसीत स्वागत
पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खास वाराणसीत आले. वाराणसी विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे स्वागत रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खासदार भूपेंद्र यादव, खासदार अनिल अग्रवाल यांनी केले.




























































