
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बबुरहा गावामध्ये दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. शेतामध्ये या दोघींचे मृतदेह सापडले असून दोघींचा मृत्यू विषप्राशनामुळे झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या शेतामध्ये तीन मुली निपचित पडलेल्या दिसून आल्या होत्या, ज्यातील दोघींचा मृत्यू झाला असून तिसरीची प्रकृती चिंताजनक आहे. तिसऱ्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या तीनही मुली बहिणी असल्याचं कळालं आहे. या मुलींचे हातपाय बांधलेले होते असं त्यांच्या भावाने म्हटलं आहे. या मुलींचे वय 13, 16 आणि 17 वर्ष आहे. मृत्यूमुखी पडलेली 16 वर्षांची मुलगी आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेली 17 वर्षांची मुलगी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत तर 13 वर्षांची मृत्यूमुखी पडलेली मुलगी ही त्यांची चुलत बहीण होती.
बहिणींच्या भावाने पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की या तिघीजणी बुधवारी शेतात चारा गोळा करायला गेल्या होत्या. उशिरापर्यंत त्या घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. शोधाशोध सुरू असताना या तिघीजणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत शेतात सापडल्या होत्या. भावाच्या या विधानाबाबत बोलताना लखनऊ रेंजच्या पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंग यांनी म्हटलंय की भावाने या मुलींचे हातपाय बांधले असल्याचं म्हटलं असलं तरी आता याबाबत काहीच सांगता येणार नाही, कारण पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या आतच या मुलींना शेतातून हलविण्यात आले होते.
उन्नावचे पोलीस अधीक्षक सुरेशराव कुलकर्णी यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले आहे की ‘असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 मुली त्यांच्याच शेतात बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. प्राथमिक तपासात त्या चारा आणायला गेल्या होत्या आणि उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नव्हत्या. घरच्यांना जेव्हा त्या शेतामध्ये दिसल्या तेव्हा त्यांच्या तोंडातून फेस येत होता. डॉक्टरांनी जेव्हा मुलींना पाहिलं तेव्हा त्यांनी विषबाधाचे अंदाज वर्तवला.’ घटनास्थळी मुलींवर जबरदस्ती झाल्याचा किंवा त्यांच्यासोबत झटापट झाल्याच्या खुणा दिसत नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. असं असलं तरी या गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


























































