
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
एनडीएत जागावाटपावरून नाराज असलेले राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. कुशवाहा केंद्र सरकारमध्ये मनुष्य बळ विकास राज्य मंत्री पदावर होते. पंतप्रधान मोदी यांनी जनतेचा अपेक्षाभंग केला असे कुशवाह यांनी म्हटले. कुशवाहा महाआघाडीत सामील होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
RLSP Chief Upendra Kushwaha after his resignation as Union Minister: Narendra Modi ji couldn’t meet expectations of the people of Bihar. Nothing was done for special status. Bihar is still where it was earlier. Education & health system is non-existent.Nothing was done for Bihar. pic.twitter.com/3D2QbVW8y4
— ANI (@ANI) December 10, 2018
मोदींकडे राजीनामा पाठवल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुशवाहा म्हणाले की, “बिहारची स्थिती आजही तशीच आहे. तसेच बिहारला कुठलेच विशेष पॅकेज मिळालेले नाही. नोकर्यांमध्ये मागास जातींवर अन्याय झाला आहे. बिहारच्या जनतेला वाटले की अच्छे दिन येतील पण त्यांची स्थिती तशीच राहिली. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील पोटनिवडणूकीत आम्हाला लढू दिले नाही, आमच्या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला.” उपेंद्र कुशवाहा हे बिहार मधील लोकसभा जागावाटपांवरून नाराज होते.
भाजपने जागवाटपाचा जो फॉर्म्युला दिला होता तो कुशवाहा यांन मान्य नव्हता. यावर ३०नोव्हेंबर पर्यंत अंतिम निर्णय न झाल्यास आपला पक्ष योग्य तो निर्णय घेईल असे कुशवाहा यांनी म्हटले होते. तसेच जागावाटपाबाबत मोदी सोडून आपण कुणाशीच चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
२०१४ साली कुशवाहा यांच्या पक्षाने भाजपसोबत लोकसभेसाठी बिहारमध्ये तीन ठिकाणी निवडणूक लढवल्या होत्या. त्या तीनही जागा जिंकण्यात त्यांना यश आले होते. नितीश कुमार जेव्हा एनडीए मध्ये परतले तेव्हापासून कुशवाह नाराज होते. कुशवाहा आणि नितीश कुमार यांचे संबंध पूर्वीपासून चांगले नव्हते.




























































