‘यूपीआय’साठी आता ‘पिन’ टाकायची गरज नाही, चेहरा किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट होणार

सध्याच्या डिजिटल युगात अनेक जण गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा यूपीआयवरून पेमेंट करतात. यूपीआय पेमेंट करताना चार अंकी पिन नंबर टाकावा लागतो. त्यासाठी पिन नंबर लक्षात ठेवणे गरजेचे असते. मात्र आता त्याची गरज नसेल. कारण युजर्स आपला चेहरा (फेशिअर रिकग्निशन) किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटला मंजुरी देऊ शकतील. ही सुविधा 8 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे यूपीआय पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे.

तज्ञांच्या मते हा बदल म्हणजे डिजिटल प्रवासातील माईलस्टोन ठरेल. तुमची ओळख हाच तुमचा पासवर्ड बनेल. यूपीआय नेटवर्कचे संचलन करणाऱ्या ‘एनपीसीआय’तर्फे या अत्याधुनिक सुविधेचे सादरीकरण मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये करण्याची योजना आहे. अद्याप ‘एनपीसीआय’ने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

नागरिकांना नेमका काय फायदा होणार?

  • सुरक्षितता ः फसवणूक आणि सायबर गुह्यांचा धोका कमी होईल.
  • सुलभता ः व्यवहार जलद आणि सहज होतील.
  • समावेशकता ः ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना डिजिटल व्यवहाराची संधी.

यूपीआय पेमेंटसाठीची ही नवी बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणाली पूर्णपणे ‘आधार’वर आधारित असेल. जेव्हा एखादा युजर चेहरा किंवा फिंगरप्रिंट सुविधेचा वापर करेल, तेव्हा त्याचे व्हेरिफिकेशन ‘आधार’वर असलेल्या बायोमेट्रिक डेटावरून केले जाईल. म्हणजे ज्या व्यक्तींचे बँक खाते किंवा यूपीआय आयडी ‘आधारकार्ड’ला जोडलेले असेल, त्याच व्यक्ती अशा पद्धतीने यूपीआय पेमेंटला मंजुरी देऊ शकतील.

बायोमेट्रिक डेटा वापरून युजर्संची ओळख पटवली जाईल. त्यानंतर युजर्संचा बायोमेट्रिक डेटा एक ‘एनक्रिप्टेड की’मध्ये रूपांतरीत होईल. ही ‘की’ बँकेकडे पाठवली जाईल, जिथे ती सत्यापित होईल आणि व्यवहार पूर्ण होईल.

यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या देशभरात वाढत आहे. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये यूपीआयवरून पेमेंट करण्याच्या संख्येत 31 टक्के वाढ झालीय. या महिन्यात एकूण व्यवहाराची संख्या 19.63 अब्ज म्हणजेच 24.90 लाख कोटी पर्यंत झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ही 24.85 लाख कोटी होती.