
तालुक्यातील कळंबुसरे येथील प्राथमिक शाळेजवळ शुक्रवारी एक भला मोठ्ठा अजगर आढळला. सर्पमित्रांनी शाळेजवळील झुडपात अडकलेल्या 11 फुटी आणि 47.3 किलो वजनाच्या या भल्या मोठ्या पायथॉन जातीच्या अजगरास सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर सर्पमित्रांनी त्याला वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले.
तालुक्यातील कळंबूसरे येथील प्राथमिक शाळेजवळील झुडपात हा अजगर अडकून पडला होता. भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत हा अजगर आला होता. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र आणि कळंबूसरे संवर्धन संस्थेचे सदस्य महेश भोईर,संतोष पाटील,ऋषीकेश भेंडे,शिवप्रसाद भेंडे व रोहन पाटील यांनी अजगराची सुटका केली. त्यांनतर चिरनेर येथील वनरक्षक सनी ढोले,रानसईचे वनरक्षक सी.एस.बोरसे यांच्यासह वन्यजीव निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य आंनद मढवी चिर्ले यांनी अजगर सुरक्षित असल्याचे पडताळून चिरनेर येथील इंद्रायणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दाभाटी वनक्षेत्रात नेऊन सोडले.






























































