उरणमध्ये रस्ता गेला चोरीला… गुगल मॅपवर सापडला

790
  • आदिवासींसह चार गावांना मिळाला अखेर न्याय
  • वहिवाट मोकळी करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

सरकारी बाबूंना हाताशी धरून उरण लॉजिस्टिक कंपनीने कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली तसेच आदिवासी पाड्यांचा जुना रस्ता हायजॅक केला होता. इतकेच नाही तर काही शेतकऱ्यांच्या जमिनींवर मातीचा भराव टाकला. याविरोधात हजारो गावकऱ्यांनी आवाज उठवला. याची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांची पडताळणी केली. इतकेच नाही तर गुगल मॅपवरदेखील या जुन्या रस्त्याच्या खाणाखुणा सापडताच या कंपनीला दणका देत तत्काळ शेतकऱ्यांची वहिवाट मोकळी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे चोरीला गेलेला रस्ता उरणकरांचा सापडला.

दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि.ने सर्व्हे नंबर 122/2 मधील शेतीकर तसेच पारंपरिक रस्त्यावर दगड, मातीचा भराव टाकला आहे. पर्यायी रस्ता म्हणून नाल्यातून नव्या दोन फुटांच्या रस्त्याची निर्मिती केली. त्यामुळे शेतीवर, डोंगर परिसरात ये – जा करणाऱ्या शेतकऱ्यांना, आदिवासी बांधवांना आपली गुरे-ढोरे नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कळंबुसरे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी तसेच कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे याविरोधात आवाज उठवत उरण तहसील कार्यालयाला निवेदन दिले. तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी शेतकऱ्यांची मात्र हरकत फेटाळली. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कळंबुसरे गाकातील शेतकरी रत्नाकर राऊत, संतोष राऊत, बाळकृष्ण पाटील, मनोहर कातकरी, बाबूराव कातकरीसह इतर शेतकरी, आदिवासींनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपिल केले होते.

हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करा!
माजी न्यायाधीश ऍड. चंद्रहास पाटील, निवृत्त तहसीलदार डी. बी. पाटील, ऍड. प्रदीप म्हात्रे, ऍड. योगेश म्हात्रे यांनी उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समोर शेतकऱ्यांची बाजू मांडली. वस्तुस्थितीजन्य पुरावे आणि गुगल मॅपवरून जुनी वहिवाट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नवले यांनी हा रस्ता शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी मोकळा करण्याचा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत रस्ता व शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीच्या हेराफेरी कारभारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या