
शासकीय कामांचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांचे मिंधे-भाजप सरकारने एक दोन नव्हे तर तब्बल बाराशे कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांची थकीत बिले न दिल्याने हे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार आणि घर कसे चालवायचे, असा प्रश्न ठेकेदारांसमोर उभे राहिले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून थकीत बिलाची फुटकी कवडीही न मिळाल्याने उरण-पनवेल मधील ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राज्य सरकारने गेल्या तीन ते चार वर्षांत उरण-पनवेलमधील शेकडो कंत्राटदारांकडून एमएमआरडीएसह इतर शासकीय विकासकामे करून घेतली. या ठेकेदारांनी दागदागिने विकून, व्याजाने पैसे काढून कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण केली. मात्र या कामांची बिले सरकारकडे जमा करूनही अद्याप त्यांना कामाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बिले वेळेत अदा न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याची खंत यावेळी कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा यावेळी संतप्त कंत्राटदारांनी दिला आहे.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट
ठेकेदारांच्या शिस्टमंडळाने याबाबत अर्थमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ असे सांगून हात वर केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे उरण-पनवेलमधील संतप्त ठेकेदार रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा दिला आहे.
            
		





































    
    






















